जिल्ह्यात २७ एप्रिलपासून १९ मेपर्यंत विशेष कर्करोग निदान मोहीम
यवतमाळ, दि. २३ : जिल्ह्यात २७ एप्रिल ते १९ मे २०२६ या कालावधीत विशेष कर्करोग निदान मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांसाठी मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनद्वारे मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक, हृदयरोग तसेच विविध प्रकारच्या कर्करोगांचे निदान व उपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात येतात. यवतमाळ जिल्ह्यात हा कार्यक्रम सन २०१८ पासून प्रभावीपणे सुरू आहे. याच अंतर्गत जिल्ह्यासाठी विशेष कॅन्सर निदान व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या व्हॅनद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ व दंत शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाची तपासणी केली जाईल. तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ही मोहीम जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
मुख, स्तन किंवा गर्भाशयमुख कर्करोगासंबंधी कोणतीही लक्षणे आढळल्यास या शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या कुटुंबीय, नातेवाईक व परिसरातील नागरिकांनाही या मोफत तपासणी मोहिमेबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी नागरिकांना केले आहे.
शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
२७ एप्रिल – प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसोला (ता. आर्णी)
२८ एप्रिल – प्राथमिक आरोग्य केंद्र पहुर (ता. बाभुळगाव)
२९ एप्रिल – प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव (ता. दारव्हा)
३० एप्रिल – प्राथमिक आरोग्य केंद्र वसंतनगर (ता. दिग्रस)
०४ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी (ता. घाटंजी)
०५ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव (ता. कळंब)
०६ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र पोहंडुळ (ता. महागाव)
०७ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी (ता. मारेगाव)
०८ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र माणिकवाडा (ता. नेर)
११ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ (ता. पांढरकवडा)
१२ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र चोंढी (ता. पुसद)
१३ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव (ता. राळेगाव)
१४ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा (ता. उमरखेड)
१५ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर (ता. वणी)
१८ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा (ता. यवतमाळ)
१९ मे – प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबन (ता. झरीजामणी)
00000
Comments
Post a Comment