यवतमाळमध्ये ३.६० लाखांचे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे जप्त; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

कृषी विभाग व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई यवतमाळ, दि.१3 (जिमाका) : जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री आणि वाहतुकीविरोधात कृषी विभाग व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत एचटीबीटी (प्लॅटिनम 5G) कापूस बियाण्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत प्रशासनाने सुमारे २० लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीवरून रचला सापळा १२ एप्रिल २०२६ रोजी यवतमाळ शहरात एका 'किया सोनेट' (GJ-09-5486) आणि अन्य एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या सापळा रचून ही वाहने अडवली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल झडती दरम्यान पथकाला मोठ्या प्रमाणात अवैध साठा मिळून आला. यामध्ये 'प्लॅटिनम 5G' नावाच्या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची ४०० पाकिटे (एकूण ८ पोते), जप्त केलेल्या बियाण्यांची बाजारभावानुसार किंमत ३.६० लाख रुपये आहे. २ चारचाकी वाहने आणि ३ मोबाईल फोन (किंमत १६.४० लाख रुपये), एकूण २० लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणी कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) प्रेमनाथ आडे यांच्या फिर्यादीवरून यवतमाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये संतोष ठाकरे (रा. चांदूर रेल्वे, जि. अमरावती), निखिल लंगडे (रा. आर्वी, जि. वर्धा), सतीश ठाकरे (रा. अमरावती) ही नावे आहेत. कठोर कायद्यान्वये कारवाई आरोपींविरुद्ध बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही कारवाई निविष्ठा व गुणनियंत्रक संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आणि कृषी विकास अधिकारी लहुदास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर, प्रवीण जाधव व सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. शेतकऱ्यांनी अनधिकृत आणि प्रतिबंधित बियाण्यांची खरेदी करू नये, कारण यामुळे जमिनीचे आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …