यवतमाळ वनवृत्तातील ३२ वनरक्षकांना वनपाल पदोन्नती
यवतमाळ दि. १६ (जिमाका): यवतमाळ वनवृत्तातील विविध विभागांतील एकूण ३२ वनरक्षकांना वनपाल पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदोन्नती समिती बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, वाशिम हे प्रादेशिक वनविभाग तसेच सामाजिक वनिकरण यवतमाळ व वाशिम आणि वन्यजीव पांढरकवडा हे विभाग मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यवतमाळ यांच्या अखत्यारीत येतात. सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीतील पदोन्नती प्रक्रियेसाठी १३ एप्रिल रोजी बैठक पार पडली.
या बैठकीस मानकर मुख्य वनसंरक्षक अध्यक्ष डॉ. किशोर एस, उपवनसंरक्षक, सामाजिक वनिकरण अमरावती सुमित कुमार, उपवनसंरक्षक वाशिम अभिजित वायकोस, विभागीय वनाधिकारी पांढरकवडा उत्तम फड तसेच प्रशासकीय अधिकारी, सदस्य सचिव प्रविण जाट उपस्थित होते.
पदोन्नतीसाठी एकूण ४८ वनरक्षकांसह इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी, शैक्षणिक पात्रता, विभागीय परीक्षा, गोपनीय अहवाल, प्रलंबित चौकशी व इतर बाबींची सखोल छाननी करण्यात आली.
त्याअनुषंगाने सध्या रिक्त असलेल्या २१ वनपाल पदांवर वनरक्षकांना तत्काळ पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत रिक्त होणाऱ्या ११ पदांवरही पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने एकूण ३२ वनरक्षकांना वनपाल पदाचा लाभ मिळणार आहे.
याशिवाय, इतर संवर्गातही पदोन्नती देण्यात आली असून १ लिपीकास लेखापाल, १ शिपाईस लिपीक, १ वाहनचालकास संवर्ग बदल करून लिपीक, तसेच १ शिपाईस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांची सेवा नोंद, पती-पत्नी एकत्रीकरण, वैयक्तिक अडचणी तसेच माजी सैनिक अशा बाबींचाही विचार करून पदस्थापना करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशीप्रमाणे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी पदोन्नती व पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत.
Comments
Post a Comment