यवतमाळात विशेष नझुल शिबिराचे आयोजन
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त नझुल प्रकरणांचा जलद निपटारा
महसूल विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या अंतर्गत यवतमाळ शहरात २२ मे २०२६ रोजी विशेष नझुल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात नझुल जमिनीशी संबंधित प्रकरणांचा जलद व सुलभ निपटारा करण्यात येणार आहे.
या शिबिरात नझुल जमिनीवरील शर्तभंग प्रकरणे नियमानुकूल करणे, हस्तांतरणास परवानगी देणे, भाडेपट्टा नूतनीकरण, फ्री होल्ड मंजुरी तसेच प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. यासोबतच सिंधी समाज बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष अभय योजनेअंतर्गत सिंधी वसाहतीतील जागा फ्री होल्ड करण्याच्या प्रकरणांचाही निपटारा केला जाणार आहे.
नझुल पट्टाधारकांनी त्यांच्या ताब्यातील नझुल पट्ट्यांचे नूतनीकरण व शर्तभंग प्रकरणे तात्काळ नियमानुकूल करून घ्यावीत तसेच थकीत भुईभाडे शासनाकडे जमा करावे. अन्यथा संबंधित पट्टे रद्द होऊन जागा शासनजमा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या शिबिरासाठी २७ एप्रिल ते २० मे २०२६ या कालावधीत उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी नायब तहसीलदार लक्ष्मीकांत देशपांडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या कालावधीत नझुल मंडळ अधिकारी व परीनिरीक्षक यांच्या माध्यमातून स्थळ पाहणी करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment