पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती

उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यवतमाळ, दि. 9 (जिमाका) :यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे घोंगरी येथील 86.08 हेक्टर शासकीय जमिनीवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात येईल, असे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले. उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले या प्रस्तावित क्षेत्राची प्राथमिक स्थळ पाहणी 26 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील भूमी निवड समितीमार्फत 19 ऑगस्ट 2024 रोजी सविस्तर स्थळपाहणी करण्यात आली. त्यानंतर 86.08 हेक्टर ई-श्रेणी शासकीय जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक उद्योजकांकडून औपचारिक मागणी प्राप्त झालेली नसली तरी पांढरकवडा परिसरात औद्योगिक क्षेत्राची आवश्यकता आहे. या अनुषंगाने संबंधित जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडे विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी पांढरकवडा–आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 पर्यंत जोडरस्ता विकसित करण्याची आवश्यकता आहे. बैठकीत मौजे वटफळी (ता. नेर, जि. यवतमाळ) येथील औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. भूसंपादन टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना देताना, एकूण 550 एकरपैकी प्रथम 250 एकर आणि त्यानंतर पुढील 250 एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचे निर्देश उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …