विशेष वृत्त : यवतमाळ जिल्ह्यात ८१६ अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी

 पीएमएफएमई योजनेतून प्रकल्पांना बळ  उद्योगांना शासनाचे ३५ टक्के अनुदान  महिलांच्या सक्षमीकरणाला गती
यवतमाळ, दि.१५ : जिल्ह्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग' (पीएमएफएमई) योजना 'गेम चेंजर' ठरत आहे. सन २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्याने या योजनेत उल्लेखनिय प्रगती केली असून, आतापर्यंत ८१६ प्रकल्पांची यशस्वी उभारणी झाली आहे. विशेष म्हणजे, या उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात १९७२ नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला गती दिली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे एकूण मूल्य २७४५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये शासनाने खंबीर साथ देत आतापर्यंत १०५२ लाख रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना हक्काचे भांडवल उपलब्ध झाले असून त्यांच्या आर्थिक सक्षमतेला शासनाचा आधार मिळाला आहे. गृहउद्योगातून रोजगार निर्मिती जिल्ह्यातील उद्योगांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, स्थानिक उपलब्ध कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया उद्योगांकडे युवकांचा आणि महिलांचा कल अधिक आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४५८ मसाला उद्योग प्रकल्प कार्यान्वित असून त्यातून ९२३ जणांना रोजगार मिळाला आहे. ११५ गहू प्रक्रिया प्रकल्पांच्या माध्यमातून १८५ जणांच्या हाताला काम मिळाले आहे. जिल्ह्यात कडधान्यावर आधारित १०६ उद्योगातून २२६ जणांना रोजगार मिळाला आहे. ३६ दुग्ध प्रक्रिया उद्योग प्रकल्प यशस्वीपणे सुरू असून ९४ जणांना रोजगार मिळाला आहे. आरोग्यदायी संकल्पनेवर आधारित २५ तेलघाणा प्रकल्पांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण त्यातून ६२ जणांना तर ७६ इतर उद्योगातून ४८२ जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. योजनेचा मुख्य उद्देश : पीएमएफएमई योजनेचा मुख्य उद्देश ही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना तांत्रिक आणि वित्तीय बळ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात या योजनेमुळे स्वयंरोजगाराचे मोठे जाळे विणले जात आहे. थोडक्यात आढावा (२०२०-२१ ते २०२५-२६): एकूण प्रकल्प संख्या:८१६ एकूण गुंतवणूक (मूल्य): ₹ २७४५ लाख वितरित अनुदान: ₹ १०५२ लाख निर्माण झालेला रोजगार : १९७२ गेल्या पाच वर्षांतील ही आकडेवारी स्पष्ट करते की, यवतमाळ जिल्हा आता 'प्रक्रिया उद्योगांचे केंद्र' म्हणून नावारूपास येत आहे. मसाला आणि गहू प्रक्रिया उद्योगांमधील भरघोस वाढ जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी ठरणारी आहे. “पीएमएफएमई योजनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक लाभार्थ्याला तांत्रिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचा भक्कम आधार देत आहोत. जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मिती हे सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.” - जिल्हा अधिक्षक कृषी अध्किारी मनोजकुमार ढगे "पीएमएफएमई योजना ही जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाचे साधन बनत आहे. यवतमाळमधील ८१६ प्रकल्पांनी हे सिद्ध केले आहे की, येथील तरुण आणि महिला वर्ग आता नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे बनत आहेत. जिल्ह्याला 'अन्न प्रक्रिया हब' बनवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे."- जिल्हाधिकारी विकास मीना

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …