रेस्टॉरंट व हॉटेल्समध्ये चीज अॅनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी लेबलिंग व माहिती स्पष्ट करण्याचे आदेश
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ हा जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
पनीर हा आहारातील महत्त्वाचा घटक असून, तो प्रथिने, कॅल्शियम व जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. मात्र पनीर आणि चीज अॅनालॉग यामध्ये मोठा फरक असून, अॅनालॉग पदार्थ दूधाव्यतिरिक्त तेल, स्टार्च व इतर घटकांपासून तयार केला जातो. तो पनीरसारखा दिसत असला तरी तो प्रत्यक्षात पनीर नसतो, असे अन्न सुरक्षा मानकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की काही रेस्टॉरंट, हॉटेल, केटरर्स व फास्ट फूड विक्रेते चीज अॅनालॉगचा वापर करून अन्नपदार्थ तयार करत असून, ग्राहकांना याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी तर “पनीर” किंवा “चीज” या नावानेच अॅनालॉग पदार्थ विकले जात असल्याचे आढळून आले आहे.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांनी ग्राहकांना घटकपदार्थांची योग्य माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच लेबलिंग व डिस्प्ले नियमांनुसार विक्री बिल, मेन्यूकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर “चीज अॅनालॉग” किंवा “डेअरी अॅनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
ग्राहकांनीही पनीर खरेदी करताना लेबल काळजीपूर्वक तपासावे, सुटे पनीर घेताना खात्री करावी तसेच हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर आणि अॅनालॉग पदार्थ वेगळे असल्याची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तसेच सर्व परवाना धारकांनी स्वतःचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अद्ययावत करावा, अन्यथा कारवाई होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन पूर्णपणे दक्ष असून, भेसळ व दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली जात असल्याचे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे-पाटील यांनी सांगितले आहे.ग्राहकांनी अशा प्रकारची तक्रार असल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment