यवतमाळ जिल्ह्यात “आपदा मित्र” ची दुसरी बॅच सुरू
150 प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
यवतमाळ, दि.10 (जिमाका) : जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून “आपदा मित्र” योजनेअंतर्गत दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
या बॅचमध्ये एकूण 150 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून त्यांना विविध आपत्ती परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी सखोल प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणामध्ये पूर, आग, भूकंप, वादळ, अपघात अशा विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी बचावकार्य कसे करावे, प्रथमोपचार कसे द्यावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत समन्वय कसा साधावा याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष सराव (Mock Drill) द्वारे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभवही दिला जात आहे.
“आपदा मित्र” योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक स्वयंसेवकांना प्रशिक्षित करून आपत्तीच्या वेळी तत्काळ मदत उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे आपत्तीच्या वेळी जीवित व वित्तहानी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवर सक्षम व प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी तयार होत असून, भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.


Comments
Post a Comment