महिला सक्षमीकरण यशोगाथा: गृहउद्योगातून ‘आत्मनिर्भतेकडे’
रूपाली गायकी यांचा ‘गृहिणी ते यशस्वी उद्योजिका’ बनण्याचा प्रवास ;
‘राघवी लाकडी तेल घाणा’शेतीपूरक व्यवसाय ठरतोय आर्थिक सक्षमतेचे साधन
'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग' योजनेचा आधार
यवतमाळ, दि.१५ : "शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल, तर संकटांचे डोंगरही पार करता येतात," हे यवतमाळच्या रूपाली आशिष गायकी यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. घरची परिस्थिती बेताची आणि शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असताना, रूपाली गायकी यांनी उद्योजिका बनण्याचे स्वप्न पाहिले आणि आज त्या 'राघवी लाकडी तेल घाणा' या उद्योगाच्या माध्यमातून वार्षिक ५ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. यातून गायकी कुटुंबियांसाठी शेतीपूरक व्यवसाय हा आर्थिक सक्षमतेचे साधन ठरत असून या गृहउद्योगातून रूपाली गायकी यांनी ‘आत्मनिर्भतेकडे’प्रवास सुरु केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कापरा मेथड या गावच्या रूपालीताईंचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले. पती शेती करायचे, परंतु मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवणे केवळ शेतीवर शक्य नव्हते. काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती, पण भांडवल आणि जागेची अडचण मोठी होती. अशा वेळी त्यांनी महिला बचत गटाची कास धरली. बचत गटातून मिळणाऱ्या छोट्या कर्जांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.
आरोग्यदायी संकल्पना: 'राघवी लाकडी तेल घाणा'
उद्योगाची निवड करताना रूपालीताईंनी केवळ नफ्याचा विचार न करता सामाजिक आरोग्याचा विचार केला. आजच्या काळात वाढत्या आजारांचे मूळ रिफाईंड तेलात असल्याचे ओळखून त्यांनी 'शुद्ध लाकडी तेल घाणा' सुरू करण्याचे निश्चित केले. यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथून प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.
शासकीय योजनांचा आधार
उद्योगासाठी भांडवल उभारताना त्यांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेचा मोठा आधार मिळाला. कृषी विभाग आणि 'आत्मा' यवतमाळच्या सहकार्याने त्यांचे कागदपत्रे पूर्ण होऊन युनियन बँकेमार्फत ३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. विशेष म्हणजे, यावर त्यांना ३५ टक्के सबसिडी सुद्धा प्राप्त झाली. स्वतःकडील २ लाख आणि बँकेचे ३ लाख अशा एकूण ५ लाख रुपयांतून त्यांनी आपला प्रकल्प उभा केला.
कुटुंबाची साथ आणि यशाची गरुडझेप
सुरुवातीला अडचणी आल्या, पण खचून न जाता त्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवली. आज रूपालीताई, त्यांचे पती आणि मुलगा हे सर्व मिळून हा व्यवसाय चालवतात. त्यांच्या तेलाची गुणवत्ता पाहून ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. केवळ तेलच नव्हे, तर त्यातून निघणारी ढेप देखील पशुखाद्य म्हणून विकली जात असल्याने उत्पन्नात भर पडली आहे.
नगरपरिषदेचे सहकार्य आणि मार्केटमध्ये स्थान
सुरुवातीला घरूनच व्यवसाय सुरू केल्यानंतर, यवतमाळ नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मार्केटमध्ये दुकान उपलब्ध झाले. यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले. आज दोन वर्षे पूर्ण झाली असून, त्यांची ओळख आता एक यशस्वी उद्योजिका म्हणून समाजात निर्माण झाली आहे.
भविष्यातील ध्येय आणि संदेश
रूपालीताईंचे आता पुढचे ध्येय इतर गरजू महिलांना रोजगार देऊन त्यांना उद्योजिका बनवण्याचे आहे. त्या म्हणतात की, "आपल्यात चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर आपण स्वतःचे ब्रँड नाव नक्कीच निर्माण करू शकतो. भांडवलाची काळजी न करता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी पुढे यावे."
उद्योजिका रूपाली गायकी यांची जिद्द, मेहनत आणि आरोग्याप्रती असलेली त्यांची सामाजिक जाणीव कौतुकास्पद आहे. एका गृहिणीपासून ते एका यशस्वी उद्योजिका होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ



Comments
Post a Comment