शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा
यवतमाळ, दि. 7 (जिमाका) : श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्षयरोग (टी.बी.), स्तनाचा कर्करोग, कर्करोग, एड्स, उच्च रक्तदाब (बी.पी.), मधुमेह (शुगर) यांसारख्या आजारांवर चर्चा होऊन शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्यविषयक पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, नुक्कड नाटक आदी उपक्रमांचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले.
यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम “आरोग्यासाठी एकत्र या, विज्ञानाच्या बाजूने उभे राहा” अशी आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव, चुकीच्या आहार पद्धती, जंक फूड व प्रक्रिया केलेल्या अन्नाचे वाढते सेवन, तसेच व्यायामाचा अभाव यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके यांनी सांगितले. संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैयक्तिक व परिसर स्वच्छता आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
या निमित्ताने नागरिकांनी दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करावा, पौष्टिक आहार घ्यावा, तसेच तंबाखू, मद्य व अमली पदार्थांपासून दूर राहावे आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावरील आरोग्यविषयक चुकीच्या माहितीपासून सावध राहून वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहितीची पडताळणी करावी, असे मत जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांनी व्यक्त केले.
तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी केले. यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, वयोवंदना योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास उपअधिष्ठाता डॉ. आनंद आशिया, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील सहायक व सहयोगी प्राध्यापक, समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय कर्मचारी, कनिष्ठ निवासी डॉक्टर, परिचारिका वर्ग तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment