१९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा; ३.७८ लाख तक्रारींचे निवारण
४ लाखांहून अधिक कॉल्स; ‘गोल्डन अवर’मध्ये ६४ हजार पशुधनाला जीवदान
पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला की शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ‘१९६२’ मोबाईल वेटरनरी क्लिनिकच्या माध्यमातून पशुपालकांना मोठा दिलासा मिळत असून, ही सेवा ग्रामीण भागासाठी ‘लाईफलाईन’ ठरत आहे.
गेल्या वर्षभरात ‘१९६२ कॉल सेंटर’कडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. यापैकी तब्बल ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक तक्रारींचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील ३४,९७९ पशुपालकांनी या सेवेचा लाभ घेतला असून, या उपक्रमामुळे पशुवैद्यकीय सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कॉल प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचत असल्याने एकूण ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. यामध्ये २९,१३० मोठे आणि ३५,५६९ लहान पशुधनाचा समावेश आहे.
पूर्वी किरकोळ आजारासाठीही पशुधनाला दवाखान्यात नेणे वेळखाऊ व खर्चिक होते. मात्र आता तज्ज्ञ पशुवैद्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्याने उपचारांसोबतच योग्य मार्गदर्शनही मिळत आहे. त्यामुळे संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले असून, दुग्धव्यवसाय अधिक शाश्वत आणि फायदेशीर ठरत आहे.
या हेल्पलाईनद्वारे औषधोपचार, शस्त्रक्रिया, खच्चीकरण, कृत्रिम रेतन, लसीकरण, जंतनाशक उपाययोजना, वंध्यत्व तपासणी तसेच आपत्कालीन सेवा पुरविल्या जात आहेत. याशिवाय पशुआरोग्य, आहार व्यवस्थापन व शासकीय योजनांची माहितीही उपलब्ध करून दिली जाते. व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून माहिती मिळवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
कॉल सेंटरमध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर, कॉल रेकॉर्डिंग व फीडबॅक प्रणालीचा वापर करण्यात येत असून, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता,एआय आधारित सेवा आणि अधिक सक्षम डिजिटल प्रणालीचा समावेश करण्याचे नियोजन आहे. यामुळे सेवा अधिक प्रभावी व जलद होणार असून, पशुधनाची हानी कमी करण्यात मदत होईल.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पशुवैद्यकीय सेवांमध्ये होत असलेली ही प्रगती ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment