शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गटांसाठी ‘संवाद सेतू कार्यशाळा’

जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, अशासकीय संस्था व स्वयं-सहाय्यता गट यांच्यासाठी “संवाद सेतू कार्यशाळा” जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना सभागृह येथे बुधवारी उत्साहात संपन्न झाली. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे २७० सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा मनोजकुमार ढगे, प्रकल्प उपसंचालक व्यंकट कुंतावर यांनी केले होते. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट विविध विभागांमधील समन्वय वाढवून शेतकरी गटांना शासकीय योजनांची माहिती व लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे हे होते. कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण मनोजकुमार ढगे यांनी केले. कृषी संलग्न विविध विभागांतील विभाग प्रमुखांनी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम, कृषी पर्यटन, महाउर्जा, नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विज्ञान केंद्र तसेच शेतमाल खरेदी करणारी कंपनी रुपीया फिनोव्हेशन प्रा. लि. यांचा समावेश होता. संबंधित तज्ज्ञांनी विविध योजनांची माहिती, वित्तीय सहाय्य, बाजारपेठ उपलब्धता तसेच उत्पन्नवाढीच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी उपस्थितांना संबोधित करताना शेतीपिकांसोबतच कृषीपूरक व्यवसायांना चालना देऊन पीक वैविधिकरण आत्मसात करणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उत्पन्नवाढ साध्य करणे, सामूहिक पातळीवर एकत्र येऊन शेत कुंपण करणे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना सर्वांपर्यंत पोहोचवणे बाबत आवाहन केले. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयं-सहाय्यता गट आणि संस्थांनी परस्पर समन्वय साधून कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी नमूद केले. यापुढेही अशा कार्यशाळा आयोजन करण्यात येईल. या कार्यशाळा जिल्ह्यातील शेतकरी कंपनी/गटांसाठी तसेच अशासकीय संस्था यांना मार्गदर्शक ठरून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान