जिल्हा परिषद येथे “लोकसेवा हक्क दिन” उत्साहात साजरा

जिल्हा परिषद सभागृह, यवतमाळ येथे दिनांक २८ एप्रिल रोजी “लोकसेवा हक्क दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांच्या अधिकारांना कायदेशीर बळ देणारा आणि प्रशासन अधिक जबाबदार बनवणारा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५” अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा निश्चित कालमर्यादेत मिळण्याची हमी देण्यात आली आहे. या कायद्यामुळे प्रशासनावर सेवा वेळेत देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, सेवा उशिरा दिल्यास किंवा नाकारल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच नागरिकांना प्रथम व द्वितीय अपील करण्याचा अधिकारही प्रदान करण्यात आला आहे. “आपले सरकार” पोर्टल https://aaplesarkar.mahaonline.gov.in च्या माध्यमातून नागरिकांकडून विविध दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात असून, ग्रामपंचायत स्तरावर ते विहित मुदतीत देणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेमुळे प्रशासनात पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व निर्माण झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार २८ एप्रिल हा दिवस “लोकसेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “सेवा हेच आपले कर्तव्य” या भावनेने शपथ घेतली. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरही विविध कार्यक्रम आणि विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मदार पत्की यांनी नागरिकांना दर्जेदार व वेळेत सेवा देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांनीही आपल्या हक्कांची जाणीव ठेवून आवश्यक तेव्हा कायद्याचा उपयोग करावा, असे त्यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जालिंदर आभाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विशाल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता प्रकाश नाटकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मुकाराम भिसे, जिल्हा कृषी अधिकारी लहूजी आडे, शिक्षणाधिकारी योजना किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती जयश्री राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले, उपशिक्षण अधिकारी प्राथमिक निता गावंडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती