कृषी अवजारे बँक : महिलांच्या आर्थिक क्रांतीची नवी दिशा

महिला सक्षमीकरण लेख ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महिला बचत गटांचे योगदान आता केवळ बचतीपुरते मर्यादित राहिलेले नाही. कारण, राज्य शासनाच्या 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' म्हणजेच 'पोकरा'च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत जाहीर झालेली 'एक गाव – एक कृषी अवजारे बँक' अंतर्गत गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापनेची संकल्पना ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५५९ गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे केवळ महिलांचे सक्षमीकरण होणार नाही, तर संपूर्ण गावच्या शेतीचे तंत्रज्ञान बदलण्याची क्षमता यात आहे. शेतीसमोर आज मजुरांची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च ही मोठी आव्हाने आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याला ट्रॅक्टर, पेरणी यंत्र किंवा काढणीची आधुनिक यंत्रे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा वेळी गावातीलच महिला बचत गटाने चालविलेली 'कृषी अवजारे बँक' हा एक उत्तम पर्याय ठरणारा आहे. महिलांच्या हाती यंत्रांची सूत्रे येणे, ही पितृसत्ताक समजल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्रात एक मोठी सामाजिक सुधारणा आहे. यामुळे महिला केवळ शेतमजूर न राहता 'सेवा पुरवठादार' म्हणून नव्या भूमिकेत समोर येतील. या योजनेचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे मिळणारे भरघोस अनुदान. प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के किंवा कमाल २४ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान ही महिला गटांसाठी सुवर्णसंधी आहे. २४ लाखांचे भांडवल उभे करणे कोणत्याही ग्रामीण गटासाठी कठीण असते, मात्र शासनाच्या या पाठबळामुळे आधुनिक यंत्रसामग्री गावापर्यंत पोहोचू शकते. या माध्यमातून गटाला भाडेतत्त्वावर यंत्रे देऊन शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. ज्या 'उमेद' किंवा 'माविम'च्या महिलांनी स्वतःला संघटित केले आहे, त्यांच्यासाठी हा उपक्रम म्हणजे त्यांच्या कष्टाचे चीज करणारा ठरणार आहे. शासनाने अर्जासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला आहे. एका गावातून अधिक अर्ज आल्यास 'लॉटरी' पद्धतीने निवड करण्याचे धोरण प्रशासकीय पारदर्शकता दर्शवते. यामुळे कोणत्याही राजकीय दबावाशिवाय खऱ्या अर्थाने काम करू इच्छिणाऱ्या गटांना संधी मिळेल. तसेच ही यंत्रे चालविण्याचे आणि त्यांच्या देखभालीचे तांत्रिक प्रशिक्षणही या महिलांना दिले जाणार आहे, जेणेकरून ही 'बँक' दीर्घकाळ फायद्यात राहील. यवतमाळ जिल्ह्यासारख्या शेतीप्रधान आणि आव्हानात्मक क्षेत्रात कृषी अवजारे बँक ही संकल्पना शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी नक्कीच पूरक ठरेल. महिलांनी आता केवळ घरगुती उद्योगांपुरते मर्यादित न राहता, शेतीच्या यांत्रिकीकरणात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. २४ लाखांपर्यंतच्या या गुंतवणुकीतून ग्रामीण भागात उद्योजकतेचे नवे पर्व सुरू होईल. गावागावातील महिला बचत गटांनी या संधीचे सोने करून आपल्या गावाला आधुनिक शेतीकडे नेण्याची 'उमेद' बाळगायला हवी. या प्रक्रियेत शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचवून ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे, तसेच महिलाही या संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील. गावस्तरावरील कृषी अवजारे बँक ही संकल्पना महिलांच्या आर्थिक क्रांतीची नवी दिशा ठरेल, अशी आशा आहे. -पवन ल. राठोड प्र.जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ. मो. 9595433332

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …