जनगणनेसाठी फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण
जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक व गांभीर्याने करा
जिल्हाधिकारी विकास मीना यांची सूचना
अचूक माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन
यवतमाळ, दि.१० (जिमाका) : आगामी जनगणना २०२७ ही व्यापक व यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली दि. ६ ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत फिल्ड ट्रेनर यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार विद्या शिंदे, जनगणना संचालनालयाचे मास्टर ट्रेनर सहाय्यक संचालक प्रविण भगत, सांख्यिकी अन्वेषक विशाल दिवेकर, जिल्ह्याचे मास्टर ट्रेनर तहसीलदार राहुल मोरे, एकनाथ बिजवे तसेच जिल्हा समन्वयक जतिन माहेश्वरी उपस्थित होते. याशिवाय चार्ज स्तरावरील अधिकारी व कर्मचारी फिल्ड ट्रेनर म्हणून सहभागी झाले होते.
प्रशिक्षणादरम्यान जनगणनेच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित अधिकारी व फिल्ड ट्रेनर यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली. घर यादी व घर गणना प्रभावीपणे राबविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल ॲपचा वापर, नागरिकांकडून माहिती संकलन करताना विचारावयाच्या प्रश्नांची योग्य हाताळणी, तसेच संकलित माहिती अचूकपणे मोबाईल ॲपवर अपलोड करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माहितीची अचूकता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, माहितीची गोपनीयता आणि निर्धारित वेळापत्रकानुसार कामकाज यावर विशेष भर देण्यात आला. तसेच मोबाईल ॲपमध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणींवर उपाययोजना करण्याबाबत मास्टर ट्रेनर्सनी सखोल मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक व गांभीर्याने करण्याच्या जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सूचना दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जनगणनेसाठी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Comments
Post a Comment