बोगस बियाण्यांपासून सावध रहा > कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन > मार्गदर्शक सूचना जारी
यवतमाळ दि.२४ (जिमाका) : आगामी खरीप हंगाम लक्षात घेला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर बियाणे व खते यांची विक्री सुरु होणार आहे. मात्र काही विकाणी अनधिकृत आणि बोगस (बनावट) कापूस बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनानुसार बियाणे खरेदी करतांना बिल नसलेले, खोटी जाहिरात, जास्त उत्पन्नाचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तीच्या भूलथापांना आणि आमिषांना बळी पडू नका. अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करा. बियाणे नेहमी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावे. रस्त्यावर किंवा अनधिकृत व्यक्तीकडुन बियाणे घेवू किंवा खरेदी करु नये.
बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्या- अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रामधून बियाणे खरेदी करतांना त्याचे पक्के बिल घ्या. बिलांवर पिकांचे नाव, वाण, लॉट क्रमांक, बियाण्यांची वैधता मुदत, बियाण्यांचा दर व एकुण मुल्य इत्यादी मजकुर स्पष्ट नमूद असल्याबाबत खात्री करा, अशा मार्गदर्शक सूचना कृषी विभागाने जारी केल्या आहेत.
“एचटीबीटी”वर कायदेशीर बंदी
भारतामध्ये एचटीबीटी (हर्बीसाईड टोलरन्ट बीटी कॅाटन) कपाशी बियाणे प्रतिबंधित आहे. अशा बियाण्यास सर्वसाधारण भाषेमध्ये राउंडअप बीटी किंवा चोर बीटी या नावाने ओळखल्या जाते. या बियाण्यांची विक्री करणे, जवळ बाळगणे किंवा लागवड करण्यास पर्यावरण संरक्षण कायद्यातर्गत पोलीस कार्यवाही होवू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
एचटीबीटी कपाशी बियाण्यांचे तोटे
एचटीबीटी कपाशी बियाणे प्रमाणित नसल्यामुळे त्याची उगवन क्षमता कमी असते. अशा प्रकारच्या बियाण्यामुळे पिकांवर नविन प्रकारच्या रोगराई येवू शकतात व ज्यामुळे जमिनीची सुपीकता खराब होवून पोत बिघडू शकते.
तक्रार निवारण कक्ष
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधुना विनंती करण्यात येते की, आपल्या परिसरामध्ये एचटीबीटी कपाशी बियाणे विक्री साठवणूक करतांना आढळून आल्यास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या 9403229991 संपर्क क्रमांकावर माहिती द्यावी किंवा तालुका स्तरावरील बियाणे निरीक्षक यांना माहिती द्यावी. अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही गोपनियता भंग होणार नाही, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
००००
Comments
Post a Comment