‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज
उष्णलहरींच्या धोक्यामुळे पशुधन संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर ; पशुपालकांनी दक्षता घ्यावी
पशुसंवर्धन आयुक्त डॅा. किरण पाटील यांचे आवाहन
राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता आणि ‘एल निनो’मुळे उष्णलहरींचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने व्यापक तयारी सुरू केली असून, पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार पशुपालकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.
वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी राज्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उष्णलहरींच्या काळात पशुधनाची काळजी कशी घ्यावी, याबाबत क्षेत्रीय स्तरावर जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सुचनानुसार पशुधनाला स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्त्वांचा समावेश करणे, तसेच दुभत्या जनावरांना संतुलित आहार देणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. शेती व वहनासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गोठ्यांमध्ये सावली, खेळती हवा आणि उष्णतारोधक व्यवस्था असावी. शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करावा, तसेच छतावर गवत किंवा पालापाचोळा टाकून पाणी मारावे. उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार यांसारख्या रोगांविरोधात लसीकरण आणि जंतनाशक औषधोपचार करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास पशुधनाला त्वरित सावलीत हलवून थंड पाण्याचा मारा करावा आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने सर्व क्षेत्रीय संस्थांना हवामान विभागाशी संपर्क ठेवून दैनंदिन तापमानाचा अंदाज घेण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला असून, फिरती पशुवैद्यकीय पथके तातडीच्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आली आहेत.
जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांनी रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
उष्णलहरींच्या काळात पशुधन उघड्यावर बांधू नये, उन्हात वाहतूक करू नये, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर चालण्यास भाग पाडू नये, पशुधनाची गर्दी करु नये, अशा ‘काय करू नये’ बाबींचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
“‘एल निनो’च्या संकटकाळात पशुपालकांनी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. ‘१९६२ कॉल सेंटर’च्या माध्यमातून पशुसंवर्धन विषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे,” अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment