अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल ; लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी मोबाईल ॲप सुरु
लाभार्थ्यांना थेट आता मोबाईलवर सेवा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप’ सुरू केले आहे.
हा ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून, लाभार्थ्यांना योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे. महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी संकेतस्थळ कार्यान्वित असून, महामंडळाची संपूर्ण कार्यपध्दती ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात येत आहे.
योजनांच्या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत असल्याने किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास असल्यामुळे लाभार्थ्यांना वेळ, खर्च आणि अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून महामंडळाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करुन योजनांच्या सेवा प्रति सेवा रु ८५ दराने उपलब्ध करुन दिल्या.
लाभार्थ्यांना अधिक स्वयंपूर्ण, सुरक्षित आणि सुलभ सेवा करुन देण्यासाठी महामडळामार्फत वापरकर्ता अनुकुल मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंळ ॲप या नावाने गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.
लाभार्थ्यांना त्यांच्या अँड्रॉइड मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करुन वापर सुरू करावा. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेल नोंदवून ओटीपी नोदणी पूर्ण करावी. पूर्वी नोंदणीकत लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून पुढील प्रक्रिया सुरु ठेवता येईल. सध्या क्लेम सादर करणाऱ्या व नव्याने मंजुर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
संगणक प्रणालीवरील सर्व सुविधा मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी मोठया प्रमाणावर हे ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब महामंडळ यांनी केले आहे.
Comments
Post a Comment