तरुणांना स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शनासाठी ‘युवा संवाद’ उपक्रम

 आयएएस, आयपीएस अधिकारी करणार मार्गदर्शन ; जिल्हा प्रशासनाचा उपक्रम  21 एप्रिलपासून सुरुवात होणार  दर सोमवारी आयोजन यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : यवतमाळ जिल्ह्यातील तरुण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन आणि शासनाच्या विविध संधीची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली, 21 एप्रिल 2026 पासून दर सोमवारी बचत भवन, यवतमाळ येथे "युवा संवाद" हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालययातील महसूल भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथमच आयोजित केलेला असून त्यात विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवेतील आयएएस, आयपीएस आयएफएस अधिकारी आणि अन्य तज्ज्ञ अधिकारी थेट संवाद साधणार असून मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक सत्र चर्चात्मक असून विद्यार्थ्यांना रिअल लाईफ अनुभव, यशकथा आणि परीक्षेसाठी व्यावहारिक मार्गदर्शन मिळणार आहे. सत्रांचे वेळापत्रक व प्रमुख वक्ते हा "युवा संवाद" दर सोमवारी होणार असून येत्या २१ एप्रिल रोजी पोलीस सेवा संधी, आव्हाने आणि मानसिक तयारी या विषयावर आयपीएस अधिकारी रॉबिन बन्सल यांचे मार्गदर्शन होणार आहे. २७ एप्रिल रोजी यशोगाथा प्रेरणा आणि अनुभव सामायिकरण या विषयावर युपीएससी उत्तीर्ण कृष्णा पिसाटे यांचे मार्गदर्शन, ४ मे रोजी युपीएससी व स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शन, ११ मे रोजी भारतीय वन सेवा तयारी कशी करावी आणि आवश्यक कौशल्ये या विषयावर भारतीय वन सेवेतील आयएफएस अधिकारी यांचे मार्गदर्शन, १८ मे रोजी एमपीएससी परीक्षांच्या संधी आणि तयारी मार्गदर्शन या विषयावर उपजिल्हाधिकारी गंगाधर ओवाळे, उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे यांचे मार्गदर्शन, २५ मे रोजी करिअरच्या विविध संधी या विषयावर नालंदा अकॅडमीचे अनुप कुमार यांचे मार्गदर्शन आणि १ जून रोजी शासन फेलोशिप- पात्रता, तयारी व संधीबाबत सीएम फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी व कुणाल पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक सत्र सकाळी ११ते दुपारी १ या वेळेत, एकूण दोन तास चालणार आहे. पहिल्या तासात अनुभवी वक्त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या तासात उपस्थित विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित केले जाईल, ज्यामध्ये शंका निरसनावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमासाठी एकूण ८०० पासेसची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे युपीएससी, एमपीएससी, टिईटी, बँकिंग आणि एसएससी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. विशेषतः आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन त्यांना नियोजित मार्गदर्शन देण्याचा उद्देश आहे. टिईटी अंतर्गत आदिवासी कोट्यातील रिक्त जागा भरुन काढण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय, प्रशासन आणि तरुण विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करुन थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व्यावहारिक रणनीती, रोडमॅप आणि अभ्यासाचे नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. करिअरच्या विविध संधींबाबतही विद्यार्थ्यांना माहिती मिळणार असून, फेलोशिप आणि उद्योजकता यांसारख्या पर्यायांवरही प्रकाश टाकण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिली.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …