क्रीडा प्रबोधिनी निवड चाचणी प्रक्रिया जाहीर; २८ ते २९ एप्रिलदरम्यान अमरावती विभागात आयोजन
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे अंतर्गत कार्यरत क्रीडा प्रबोधिनींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता निवड चाचणी प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व गडचिरोली या नऊ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात आल्या आहेत. या प्रबोधिनींमध्ये निवासी स्वरूपात प्रवेश दिला जाणार असून, निवड प्रक्रिया सरळ प्रवेश (५० टक्के) व कौशल्य चाचणी (५० टक्के) या पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
जुदो, जिम्नॅस्टिक, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, हँडबॉल व सायकलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना सरळ प्रवेशासह कौशल्य चाचणीद्वारे संधी दिली जाईल, तर राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंची निवड कौशल्य चाचणीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अमरावती विभागामार्फत ही निवड चाचणी प्रक्रिया दि. २८ ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी https://forms.gle/2d3yQi4ZAoXLrwaj8 या गुगल लिंकद्वारे नोंदणी करणे अनिवार्य आहे.
निवड चाचणीस उपस्थित राहताना जन्माचा पुरावा, स्पर्धा प्रमाणपत्रे व ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment