जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा
उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चा अंमलबजावणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारी आयोजित ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, सहायक जिल्हाधिकारी रेवैय्या डोंगरे, उपजिल्हाधिकारी देशपांडे, पुनम अहिरे, उपजिल्हाधिकारी अविनाश शिमटे, तहसिलदार राहुल मोरे, प्र.पोलीस उपअधिक्षक सुनील हुड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार किसन वानखेडे म्हणाले की, आपण सामान्य व्यक्तींच्या सेवेसाठी कार्यतत्परत आहोत. काम करत असतांना शेतकरी, महिला, युवक, सामान्य नागरिकांची वेळेवर कामे तात्काळ केली पाहिजे. सामान्य लोकांची कामे वेळेत केल्या तर अडचणी येणार नाही. प्रशासनाने पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालमर्यादा आणि कार्यक्षमता या चार स्तंभावर काम केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विहित काल कालमर्यादेत सेवा देणाऱ्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये पोलीस अधिक्षक कुमार चिंता, सहायक जिल्हाधिकारी रेवैय्या डोंगरे, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम, कार्यकारी अभियंता विक्रांत शिरभाते, तहसीलदार अमित भोईटे, दुय्यम निरिक्षक (कामगार) रविंद्र जतकर, विजय गुल्हाने, दुय्यम निरिक्षक (राज्य उत्पादन शुल्क) चंद्रकांत नागुलवाड, जिल्हा प्रकल्प अधिकारी फिरोज पठाण यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम व त्याअंतर्गत सुरु असलेल्या सेवांची माहिती दिली. तहसिलदार राहुल मोरे यांनी केले.
लोकसेवेची शपथ
सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत व सौजन्याने देण्याची शपथ घेतली. हा कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडला.


















Comments
Post a Comment