“मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रात प्रवेश प्रक्रिया सुरू
यवतमाळ, दि.2 (जिमाका) : राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्षवेध हा महत्त्वकांशी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, स्पर्धाचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करिअर मार्गदर्शन खेळाडूच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित होण्याच्या दृष्टीने मिशन लक्षवेध ही योजना अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे क्रीडा प्रतिभा विकास केंद्रकरीता अॅथलेटीक्स व वेटलिफ्टींग या खेळासाठी मान्यता प्राप्त झालेली आहे.
जिल्ह्यात अॅथलेटिक्स व वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांसाठी अनिवासी क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून, पात्र खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे प्रत्यक्ष किंवा ईमेलद्वारे 10 एप्रिल 2026 पर्यंत सादर करावेत.
प्रवेशासाठी 31 डिसेंबर 2026 रोजी 21 वर्षांखालील मुले व मुली पात्र राहतील. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र तसेच वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे बंधनकारक आहे.
निवडीसाठी राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर भारतीय शालेय क्रीडा महासंग सहभागी खेळाडूंना प्राधान्य देण्यात येणार असून, मागील दोन वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन तसेच क्रीडा कौशल्य व फिटनेस चाचण्यांवर आधारित अंतिम निवड होईल.
निवड झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, पायाभूत सुविधा, स्पर्धांचे आयोजन, स्पोर्ट्स सायन्स सुविधा, करिअर मार्गदर्शन तसेच देशी-विदेशी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासोबतच पूरक आहार, वैद्यकीय तपासणी व स्पर्धा सहभागासाठी लागणारा खर्चही शासनामार्फत केला जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
Comments
Post a Comment