अण्णासाहेब पाटील महामंडळाचा डिजिटल प्रशिक्षण उपक्रम
लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर भर
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर दिला जात आहे. या अनुषंगाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम तसेच ‘मार्केटिंग टॅब’सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात उत्पादन तयार करण्याइतकेच ते योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणेही महत्त्वाचे आहे. अनेक लघुउद्योजकांकडे दर्जेदार उत्पादने असूनही त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी महामंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ‘व्यवसाय वर्धन’ (बिझनेस प्रमोशन) मार्केटिंग टॅब विकसित केला आहे. हा टॅब फ्लिपकार्ट, ॲमेझॅान आणि इंडिया मार्ट यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे.
या प्लॅटफॉर्मद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. तसेच व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका यानुसार शोध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. “लोकल ते ग्लोबल” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न असून, भविष्यात पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही महामंडळ प्रयत्नशील आहे.
डिजिटल प्रशिक्षण : यशस्वी व्यवसायाची पायाभरणी
कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी केवळ भांडवल नव्हे, तर योग्य ज्ञान, कौशल्ये आणि बाजारपेठेची समज आवश्यक असते. यासाठी महामंडळाने वेबिनार (ऑनलाईन मार्गदर्शन सत्र), यूट्यूब (व्हिडिओ माध्यम) आणि पॉडकास्ट (ऑडिओ कार्यक्रम) यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत.
या प्रशिक्षणांमध्ये व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग, डिजिटल विपणन, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, ग्राहक हाताळणी आणि आर्थिक नियोजन अशा विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते. प्रशिक्षणाचे व्हिडिओ अधिकृत यूट्यूब व फेसबुक चॅनेलवर उपलब्ध असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांना त्यांच्या सोयीनुसार शिकण्याची संधी मिळत आहे.
डिजीलॉकर सेवा एकत्रीकरण
महामंडळाने डिजीलॉकर सेवा आपल्या प्रणालीमध्ये समाविष्ट केली आहे. त्यामुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह झाली आहे. पुढील काळात महा आयडी तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याशी एकत्रीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
या सर्व उपक्रमांमुळे लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर व्यवसाय उभारणीपासून ते बाजारपेठ विस्तारापर्यंत सर्वंकष सहाय्य मिळत आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.
Comments
Post a Comment