खरीप हंगामाअंतर्गत महाडीबीटी योजनांच्या लाभाकरीता शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज करावे
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत विविध घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
प्रमुख ठळक बाबी :
योजनेचे नाव: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, व कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, उपलब्ध घटक: प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिके, समाविष्ट पिके: गळीतधान्य, अन्नधान्य आणि कडधान्य, अर्जाची पद्धत: महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
उद्देश :
खरीप हंगामात तेलबिया व कडधान्य पिकांचे क्षेत्र आणि उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. महाडीबीटी प्रणालीवर यासाठीची अर्जाची खिडकी आता खुली करण्यात आली आहे.
तरी यवतमाळ जिल्ह्यातील ज्या पिकांसाठी लक्षांक देण्यात आले आहेत, त्या पिकांसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपल्या अर्जाची नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment