यशस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न महिला बचत गट हे महिलांच्या सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणाचे व्यासपीठ
शितल संजय राठोड यांचे प्रतिपादन
महिलांना २२ कोटींहून अधिक कर्जवाटप; अडीच कोटींचे धनादेश वितरण व उद्योजिकांचा गौरव
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत कार्यरत यशस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गंगा-काशी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन शितलताई संजय राठोड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा वृक्ष, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सन २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना शितलताई राठोड यांनी महिला बचत गट हे केवळ आर्थिक माध्यम नसून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. बचत गटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून स्वावलंबनाची भावना बळकट झाली आहे. कुटुंबाच्या विकासात महिलांचे योगदान अधिक प्रभावी झाले असून आज महिला विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी उद्योग-व्यवसाय उभारून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले. ही चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्व महिलांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला सखी वन स्टॅाप सेंटरचे व्यवस्थापक मिलन जगताप, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुशील गरुड, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, विविध बँकांचे जिल्हा समन्वयक, संस्थेच्या अध्यक्षा संगीता गायकवाड, व्यवस्थापक सुनंदा मानकर तसेच स्वयंसहाय्यता बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकातून सुनंदा मानकर यांनी संस्थेच्या विविध विकासात्मक उपक्रमांचा आढावा घेतला.
केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ४९ गावांमध्ये व शहर भागातील एकूण १,०५५ महिला बचत गटांमधील ११ हजार ६०५ महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील गरीब, गरजू, अनुसूचित जमाती, विधवा, घटस्फोटित, अल्पभूधारक व मजूर वर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना, प्रशिक्षणे व उपजीविका प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात यशस्विनी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत ५३८ बचत गटांना २२ कोटी ९० लाख ३५ हजार ७४५ रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. तसेच १,०४४ गटांमार्फत ३६ कोटी ८५ लाख ६५ हजार रुपयांचे अंतर्गत कर्ज व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात महिला बचत गटांना अडीच कोटी रुपयांच्या कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी ५०० महिलांना परसबाग किट चा वाटप करण्यात आला पर्यावरणाच्या संवर्धन साठी ५० महिलांना शेवग्याचे झाड वाटप करण्यात आले.
यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा, उद्योजिकांचा तसेच प्रेरणादायी महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्वतःचा व्यवसाय उभारून इतर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजिका प्रतिभाताई वाघमारे यांच्यासह अनेक महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे लेखापाल प्रवीण निर्मळकर यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
महिलांच्या नेतृत्व विकासासाठी, आर्थिक साक्षरता, बचत गट व्यवस्थापन, स्त्री-पुरुष समानता, कायदेविषयक जनजागृती, आरोग्य, हवामान बदल व कौशल्य विकास यांसारख्या विषयांवर विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात माविम व लोकसंचालित साधन केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले






Comments
Post a Comment