लेख : कर्जमुक्ती योजना : शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीकडे पाऊल

शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही केवळ कर्जमुक्तीची योजना नसून, शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीचा आणि आत्मविश्वास वाढविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणारी आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा व्यापक आवाका. या योजनेत राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या स्वतःच्या निधीतून वितरित करण्यात आलेल्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे केवळ एका विशिष्ट बँकेपुरती मर्यादित न राहता विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना समान लाभ मिळणार आहे. यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी अनेक कर्जमाफी योजनांमध्ये काही बँका किंवा वित्तीय संस्थांचा समावेश नसल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत होते. यावेळी शासनाने विविध बँकिंग व्यवस्थांचा विचार करून सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने या योजनेसाठी स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. त्यामुळे लाभाचे वितरण अधिक पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित बँका किंवा सहकारी संस्थांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासन, बँका आणि सहकारी संस्थांनीही या प्रक्रियेत समन्वय राखून पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या योजनेचा आणखी एक सकारात्मक पैलू म्हणजे शासनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढल्यास त्याचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहत नाही. कृषी अवजारे, बियाणे, खते, वाहतूक, प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण बाजारपेठांनाही त्याचा लाभ होतो. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्राला गती मिळण्यास मदत होऊ शकते. कर्जमुक्ती सोबतच शेतीला दीर्घकालीन स्थैर्य देण्यासाठी सिंचनाचा विस्तार, हमीभाव व्यवस्था अधिक प्रभावी करणे, पीकविमा योजना सक्षम करणे, मूल्यवर्धन उद्योगांना प्रोत्साहन आणि शेतमालाच्या बाजारपेठेपर्यंत सुलभ पोहोच यांसारख्या उपाययोजनांवरही सातत्याने भर दिले जात आहे. एकूणच, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी आणि सकारात्मकता निर्माण करणारी योजना ठरणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पारदर्शकपणे आणि वेळेत पोहोचवला जाणार असून ही योजना ग्रामीण विकास, कृषी क्षेत्रातील स्थैर्य आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. -पवन राठोड प्र. जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती