शाळा प्रवेशोत्सवासाठी ७८ अधिकाऱ्यांची नियुक्ती
विद्यार्थ्यांच्या स्वागतासह शाळांची गुणवत्ता व सुविधांची करणार तपासणी
राज्य शासनाच्या 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील शाळांना भेट देण्यासाठी वर्ग-१ व वर्ग-२ मधील ७८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी ३० जून २०२६ रोजी नियोजित शाळांमध्ये उपस्थित राहून नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करतील तसेच शाळांतील विविध सुविधांची पाहणी करणार आहेत.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी याबाबत आदेश जारी केले असून, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करणे, शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
नियुक्त अधिकारी शाळांमधील भौतिक सुविधा, खेळाची साधने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पुस्तक व्यवस्था, शालेय पोषण आहार, स्वच्छतेच्या सवयी आदी बाबींची तपासणी करणार आहेत. तसेच धोकादायक इमारती, वापराअभावी किंवा पाण्याअभावी बंद असलेली स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत समस्या आढळल्यास संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी यांनी नियुक्त अधिकाऱ्यांना ३० जून रोजी सकाळी ११ वाजता नियोजित शाळेत उपस्थित राहून विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment