जिल्हा न्यायालयात जागतिक बाल कामगार विरोधी दिन साजरा
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जून रोजी जागतिक बाल कामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) दीपक एच. दाभाडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे दुकाने निरीक्षक रविंद्र जतकर आणि दुकाने निरीक्षक चंद्रकांत मरसकोल्हे उपस्थित होते.
यावेळी रविंद्र जतकर आणि चंद्रकांत मरसकोल्हे यांनी उपस्थित पॅरा विधी स्वयंसेवकांना बाल कामगार प्रतिबंधक कायदे, बाल कामगारांच्या समस्या तसेच बालमजुरी निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात कार्यरत पॅरा विधी स्वयंसेवक, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच चाइल्डलाइनच्या प्रतिनिधींनी यवतमाळ शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये जनजागृती मोहीम राबविली. स्टेट बँक चौक, हनुमान आखाडा चौक, इंदिरा मार्केट, सराफा लाईन तसेच अन्य व्यापारी आस्थापनांना भेट देऊन बाल कामगार कार्यरत आहेत अथवा नाहीत याची पाहणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान दुकान व आस्थापना मालकांना बाल कामगार ठेवणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. बाल कामगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड तसेच दोन ते तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बाल कामगार कामावर ठेवले नसल्याबाबतची माहितीपत्रके संबंधितांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या आस्थापनांच्या दर्शनी भागात लावण्यात आली.
शहरातील अनेक दुकाने व आस्थापनांना भेट देऊन बालमजुरीविरोधी कायदे, बालहक्क आणि बालसंरक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास पॅरा विधी स्वयंसेवक, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment