उमरखेड आयटीआयमध्ये २८४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

२१ जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवीपेक्षा कौशल्याला अधिक महत्त्व प्राप्त होत असून उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हु. म. चौ. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), उमरखेड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना दि. २१ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध आहे. संस्थेमध्ये वीजतंत्री, तारतंत्री, मोटार वाहन यांत्रिकी, डिझेल यांत्रिकी, वस्त्रनिर्मिती, सौंदर्यशास्त्र, संगणक चालक व प्रोग्रामिंग सहाय्यक, वेल्डर, फिटर तसेच पत्रा धातुकाम कारागीर या रोजगाराभिमुख व्यवसायांसाठी एकूण २८४ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वस्त्रनिर्मिती व सौंदर्यशास्त्र हे व्यवसाय महिलांसाठी शंभर टक्के राखीव असून इतर व्यवसायांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासन नियमानुसार आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेमध्ये प्रवेश अर्ज भरणे व प्राधान्यक्रम निश्चित करण्याची सुविधा सुट्टीच्या दिवसांसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश कालावधीत दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जून पर्यंत प्रशिक्षणार्थी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे, अर्जामध्ये दुरुस्ती करणे, अर्ज निश्चित करणे तसेच व्यवसाय व संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करू शकतात. प्रवेश प्रक्रिया नियमित शासकीय ८० टक्के जागा तसेच संस्थात्मक व्यवस्थापन समिती (आयएमसी) कोट्यातील २० टक्के जागांसाठी गुणवत्ता यादीच्या आधारे राबविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया, शुल्क व इतर सविस्तर माहिती संकेतस्थळावर तसेच संस्थेमध्ये उपलब्ध आहे. प्रशिक्षणादरम्यान पात्र प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळते. याशिवाय समाजकल्याण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अल्पसंख्याक विभाग आणि इतर शासकीय योजनांमार्फत विविध शिष्यवृत्तींचा लाभ मिळतो. आयएमसी कोट्यात प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू असून दोन वर्षीय व्यवसाय पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना बारावी समकक्षता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वे, अग्निवीर भरती, भारतीय वायुसेना, भारतीय नौदल, आयुध निर्माणी, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. याशिवाय उत्पादन उद्योग, वाहन उद्योग, वीज वितरण, बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत नामांकित उद्योगांमध्ये प्रशिक्षणासह रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेक विद्यार्थी विविध आर्थिक महामंडळे व बँकांच्या सहाय्याने स्वयंरोजगार सुरू करून यशस्वी उद्योजक म्हणूनही पुढे येत आहेत. तसेच प्रशिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम, कमवा व शिका योजना आणि उद्योगसंलग्न उच्च शिक्षणाच्या संधीमुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासोबत पुढील शिक्षण घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक प्रशिक्षण सुविधा, उद्योगसंलग्न प्रशिक्षण, रोजगाराभिमुख उपक्रम आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. सन २०२४-२५ मध्ये राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे प्रवेश घेऊन कौशल्य, गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधींच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डी. पी. पवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती