१५ दिवसांचे ऑफलाईन प्रशिक्षण, अधिकृत प्रमाणपत्र आणि रोजगारक्षम कौशल्य विकासाची संधी
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ‘अमृत मानसमित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १५ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, अधिकृत प्रमाणपत्र, क्षेत्रीय कार्याचा अनुभव आणि रोजगारक्षम कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे ही राज्य शासनाची अग्रगण्य संस्था तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, सक्रिय श्रवण, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य या विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पुणे येथे १५ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये परस्परसंवादी सत्रे, प्रकरणांचा अभ्यास, प्रात्यक्षिक उपक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल. त्यानंतर एक महिन्याचा क्षेत्रीय अनुभव कालावधी राहणार असून सहभागी उमेदवारांना जिल्हास्तरावर शाळा अथवा महाविद्यालयांशी जोडण्यात येणार आहे. पुढील तीन ते पाच महिन्यांपर्यंत नियमित मार्गदर्शन, पर्यवेक्षण, अडचणींचे निराकरण आणि व्यावसायिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची संधी, सामाजिक संस्थांमधील रोजगाराच्या संधी आणि व्यावसायिक संपर्क वाढविण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र तसेच सामाजिक कार्य विषयातील पदव्युत्तर पदवीधारक (एमएसडब्ल्यू) उमेदवार अर्ज करू शकतात. संबंधित क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षण पात्र उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत असले तरी निवास, भोजन व राहण्याचा खर्च उमेदवारांना स्वतः करावा लागणार आहे. इच्छुकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. पहिल्या प्रशिक्षण तुकडीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून २०२६ आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता प्रशिक्षित समुपदेशकांची आवश्यकता पूर्वीपेक्षा अधिक असल्याचे मत महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे डॉ. कापसे यांनी व्यक्त केले असून, मानसिक आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू इच्छुक युवक-युवतींसाठी हा उपक्रम सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक, अमृत, यवतमाळ यांनी दिली.
Comments
Post a Comment