क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत संचालित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतीगृह नवीन, आनंद नगर, यवतमाळ येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती गृहपाल एस. एल. तेलंगे यांनी दिली.
शासकीय वसतीगृहात विद्यार्थिनींना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता तसेच इतर आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे.
प्रवेश प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी ८० टक्के, अनुसूचित जमातीसाठी ३ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के, दिव्यांग विद्यार्थिनींसाठी ३ टक्के तसेच अनाथ विद्यार्थिनींसाठी २ टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.
सदर प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थिनींनी शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. शालेय स्तरावरील तसेच इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून असून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी १५ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
Comments
Post a Comment