शेतकरी व ग्रामीण उद्योजकांसाठी २ जुलैला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय जनजागृती कार्यक्रम

ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लीड जिल्हा बँक कक्ष (सेंट्रल बँक ऑफ इंडिया), यवतमाळ यांच्या वतीने विशेष राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने शेती, संलग्न क्षेत्रे तसेच ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग घटकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. दि. २ जुलै रोजी सकाळी १० वाजता राधा मंगल हॉल, यवतमाळ येथे पार पडणार आहे. पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विशेष मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशातील असंघटित व वंचित घटक, विशेषतः शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्थांचे सदस्य, ग्रामीण कारागीर, शेतमजूर आणि लघु उद्योजक यांच्यापर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय योजनेचा लाभ पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच ग्रामीण भागात नियमित बचतीची सवय निर्माण करून नागरिकांना भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेही या उपक्रमाचे ध्येय आहे. या जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य हेतू राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबाबत व्यापक जनजागृती करणे आणि आर्थिक साक्षरता वाढविणे हा आहे. जिल्ह्यातील विविध घटकांना एकत्र आणून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी, कामगार व लघु उद्योजकांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध शासकीय विभाग व संस्थांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, शेतकरी उत्पादक संस्था महासंघ, जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बँक सखी, समुदाय संसाधन व्यक्ती, धन फाउंडेशन, क्रिसिल फाउंडेशनचे क्षेत्रीय प्रतिनिधी तसेच सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १५० हून अधिक प्रमुख प्रतिनिधींना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, ग्रामीण नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक सुरक्षित भविष्यासाठी बचतीची सवय अंगीकारावी, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती