एल निनोची चाहूल - पाणी अडवण्याची जबाबदारी

'एल निनो' ही फक्त हवामानाची घटना नाही, ती मानवी समाजाची सत्वपरीक्षा आहे. शास्त्रज्ञांनी यंदा 'सुपर एल निनो'चा इशारा दिला आहे. त्यामुळे मान्सून लांबणे, पावसाचे अनिश्चित चक्र, दुष्काळाची टांगती तलवार हे चित्र समोर येत आहे. पण भीतीने हातपाय गाळून चालणार नाही. एल निनोचा इतिहास सांगतो की, ज्या समाजाने आधीच तयारी केली, पाणी अडवले, जमीन वाचवली, तोच समाज संकटातून ताठ मानेने उभा राहिला. म्हणूनच मृद व जलसंधारण मंत्री या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी, प्रत्येक गावाला आवाहन आहे की, आता पाणी अडवण्याची तयारी करावी. निसर्गाचा इशारा 'एल निनो' हा पृथ्वीच्या नैसर्गिक हवामानचक्राचा भाग आहे. पण गेल्या १०० वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. वृक्षतोड, जमिनीचा ऱ्हास, भूजलाचा बेसुमार उपसा आदी कारणांमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. परिणामी एकीकडे महापूर, दुसरीकडे तीव्र दुष्काळ. हा इतिहास आपल्याला शिकवतो की, एल निनोच्या काळात जलसंधारण नसेल तर मानवाला मोठी किंमत मोजावी लागते. माझ्या मते चिंता करण्याऐवजी आपण कृती करूया. मृद व जलसंधारण विभागाने 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' मोहीम हाती घेतली आहे. कारण एल निनोच्या वर्षात पाऊस कमी पडला तरी, पडलेला प्रत्येक थेंब जर आपण अडवला, तर दुष्काळ टाळू शकतो. शेतकऱ्यांसाठी एल निनो काळातील चार मंत्र १. पाणी अडवा, पाणी जिरवा: बांधबंदिस्ती, सीसीटी, नाल्यांचे खोलीकरण ही कामे युद्धपातळीवर करावी. पडलेल्या पावसाचा थेंब अन थेंब वाहून जाऊ न देता तो जमिनीत मुरला पाहिजे. २. गाळ म्हणजे सोने: धरणे, तलाव आणि बंधाऱ्यातील गाळ काढून तो शेतात टाका. एल निनोच्या वर्षात हा गाळ ओलावा धरून ठेवतो आणि उत्पादन वाढवतो. तसेच धरणातील गाळ निघाल्याने पाणी साठवण क्षमता ३० टक्याने वाढते. ३. पीक पद्धती बदला: एल निनोच्या वर्षात जास्त पाणी लागणारी पिक पद्धती घेणे टाळावे. कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीची पिके, डाळी, तेलबिया यांना प्राधान्य द्यावे. हवामान खात्याचा अंदाज घेऊन पेरणी करावी. ४. झाडे लावा, जीवन वाचवा : वृक्षतोड ही एल निनोची तीव्रता वाढवते. प्रत्येक शेतकऱ्याने शेताच्या बांधावर, शेताच्या कडेने किमान १० झाडे लावावी. शासन खंबीरपणे पाठीशी महाराष्ट्र शासनाने मृद व जलसंधारण विभागासाठी निधी वाढवला आहे. गावागावात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. पण हे फक्त शासनाचे काम नाही, ही जनचळवळ आहे. 'पाणी अडवले तरच जीवन जगेल' हे सूत्र प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे.
एल निनो, दुष्काळ हे सगळे जोडले गेले आहेत. पण आपला शेतकरी हा मातीचा कैवारी आहे. त्याने अनेक संकटे झेलली आहेत. म्हणून मी सांगतो की, एल निनोची भीती बाळगू नका. तयारी करा. कारण संकटापूर्वी व्यवस्थापन करणारा समाजच इतिहास घडवतो. पाऊस निसर्ग देईल, पण पाणी अडवण्याची जबाबदारी आपली आहे. चला, मिळून महाराष्ट्राला 'जलसमृद्ध महाराष्ट्र' बनवूया. संजय राठोड, मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती