जनगणनेच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

घरांना भेटी देवून केली पडताळणी ; खरी व अचूक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्यात जनगणनेचे काम सुरू असून यात प्रगणक, पर्यवेक्षक घरोघरी जावून कुटुंब व नागरिकांची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवित आहेत. या जनगणनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व फिल्डवरील अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळमधील चौसाळा परिसरात भेट देऊन कामाची प्रगती जाणून घेतली. सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी जनगणना करण्यात येत आहे. यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना करण्याची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रत्यक्ष घरी भेट देऊन जनगणनेचे काम करण्यात येत आहे. या राष्ट्रीय कामाची प्रगती तसेच फिल्डवर येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौसाळा परिसरातील घरांना भेटी दिल्या. प्रगणक यांच्यामार्फत सुरू असलेली जनगणना अचूक होत आहे का, याची त्यांनी स्वतः पडताळणी केली. जनगणनेच्या कामासाठी घरी येणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना, नागरिकांनी खरी व अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. कामात काही अडचणी आल्यास समन्वयाने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना दिल्या.यावेळी तहसीलदार विद्या शिंदे, प्रगणक, पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात घर, कुटुंबातील भौतिक सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. ज्या नागरिकांनी 1 ते 15 मे या कालावधीत www.se.census.gov.in या पोर्टलवर स्वतःहून ऑनलाईन माहिती भरली आहे, त्यांचा एक 'युनिक आयडी' तयार झाला आहे. प्रगणक घरी आल्यानंतर केवळ आपला 'युनिक आयडी' क्रमांक त्यांना सादर करायचा आहे. तर ज्या नागरिकांनी माहिती भरली नाही, त्यांची माहिती प्रगणक स्वतः त्यांच्या घरी जाऊन डिजिटल उपकरणांद्वारे सुरक्षितपणे संग्रहित करीत आहेत. घरांची आणि घरात असलेल्या सुविधांच्या माहितीचा हा पहिला टप्पा 14 जून रोजी संपल्यानंतर, प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना ही 1 फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती