शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा कलंक दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे
कै.
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.
निलेश हेलोंडे यांचे निर्देश
>
मिशनसंबंधी विविध विभागांचा जिल्हास्तरीय आढावा
यवतमाळ, दि. 2
(जिमाका) : यवतमाळ
जिल्ह्यावरील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा हा कलंक दूर करण्यासाठी सर्व विभागांनी
एकत्रितपणे काम करावे, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष
ॲड. निलेश हेलोंडे यांनी विभाग प्रमुखांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात
त्यांनी मिशन संबंधित विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, प्रकल्प संचालक आनंद इंगळे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मंगेश काळे, जिल्हा
उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांच्यासह विविध
विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे
यांनी प्रेरणा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे व हेल्पलाईन
क्रमांकाचा प्रचार प्रसार करावा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना भेटी देऊन
त्यांना शासकीय मदत द्यावी, त्यांना रोजगार व कौशल्य प्रशिक्षण द्यावे, कृषी यंत्र
उपलब्ध करून द्यावेत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेअंतर्गत तक्रार
नोंदविण्यासाठी उपलब्ध ऑनलाईन पोर्टलची माहिती ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायतच्या दर्शनी
भागात प्रदर्शित करावी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतपिकावरील
प्रक्रिया उद्योग सुरू करावे, अवैध सावकारीबाबत तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
करावा, पीक कर्ज वाटपाला गती द्यावी, आरसेटी आणि कौशल्य विकास विभागाने एकत्रितपणे
शिबिर घ्यावेत, चारा लागवड करावी, शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता
योजनेचा लाभ द्यावा, शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांच्या शिधापत्रिका अद्ययावत
कराव्यात, ग्रामीण भागातील मुलांसाठी क्रीडांगण उपलब्ध करावे इत्यादी निर्देश ॲड. निलेश
हेलोंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्व विभागांनी
एकजुटीने आणि समन्वयाने काम केले, तर जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तनाची क्रांती घडू
शकते,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी
त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रम आणि शेतकऱ्यांसाठी करण्यात
येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
‘मिशन
उभारी’चे
कौतुक
शेतकरी
आत्महत्या रोखण्यासाठी तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी
विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन उभारी’
या उपक्रमाची माहिती ॲड. निलेश हेलोंडे यांनी जाणून घेतली. शेतकरी कुटुंबांना आधार
देण्याच्या दृष्टीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी ‘मिशन उभारी’चे
कौतुक केले.
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्राला भेट
जिल्हास्तरीय
आढावा बैठकीनंतर मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांनी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन
केंद्र, यवतमाळ तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास भेट देऊन तेथील कामकाजाची
माहिती घेतली.
Comments
Post a Comment