गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी ६० टक्के अनुदान मिळणार

 पोकरा प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू  पात्र महिला बचत गटांना लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा टप्पा २.० अंतर्गत गावस्तरावरील कृषी अवजारे बँक या घटकासाठी पात्र गटांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या योजनेतून पात्र बचत गटांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्प किमतीच्या ६० टक्के अनुदान तत्वावर लाभ मिळणार आहे. कृषी विभागामार्फत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक पात्र गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्पाचे नोडल अधिकारी नितीन घाडगे यांनी केले आहे. या योजनेसाठी गावातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) पुरस्कृत महिला बचत गट, महिला ग्रामसंघ तसेच आत्मा पुरस्कृत महिला शेतकरी बचत गट पात्र राहणार असून अर्ज करू शकणार आहेत. मात्र, अर्ज करण्यासाठी संबंधित बचत गटाला दोन आर्थिक वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. प्रकल्प किमतीच्या ६० टक्के अनुदान गावस्तरावर कृषी अवजारे बँक उभारण्यासाठी प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या ६० टक्के अनुदान मिळणार आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास एफपीओ-डीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. यामध्ये एका गावातून एका गटाची निवड करण्यात येणार आहे. अवजारांची निवड या प्रकल्पांतर्गत गावामध्ये हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविण्यासाठी यंत्रसामग्री समाविष्ट करणे अपेक्षित आहे. त्यानुसार कृषी अवजारे बँकेमध्ये रुंद वरंबे (बेड) तयार करण्यासाठी किमान एक ते कमाल पाच बेडमेकर तसेच किमान 5 ते कमाल २५ बियाणे टोकण यंत्रे हे अवजार असणे बंधनकारक आहे. या घटकासाठी अर्ज करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. इच्छुक पात्र गटांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष व आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. अर्जासाठी लिंक देण्यात आली असून https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/IndividualFarmer/Login पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र महिला बचत गटांनी या संधीचा लाभ घेऊन गावस्तरावर कृषी यांत्रिकीकरणाला चालना द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित