दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाचा उपक्रम;
पिंपरी गावालगत नाल्यावर ८ मीटर लांबीच्या वनराई बंधाऱ्याची निर्मिती
यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळीत वाढ करणे तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्याच्या उद्देशाने शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेअंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, , पुणे येथील आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या संकल्पनेतून वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय, यवतमाळ आणि चिडबर्डी येथील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून श्रमदान करत पिंपरी गावालगतच्या नाल्यावर ८ मीटर लांबीचा वनराई बंधारा बांधण्यात आला.
या उपक्रमाच्या प्रसंगी विभागाचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर, वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन तट्टे तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्रमदान करून जलसंधारणाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.
वनराई बंधाऱ्यामुळे नाल्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार असून, भूजल पुनर्भरणास हातभार लागणार आहे. परिणामी परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यास तसेच शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या जलसाठ्याला मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या उपाययोजना अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.
जलसंधारण ही काळाची गरज असून, पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जमिनीत जिरविणे हीच दुष्काळमुक्तीकडे जाण्याची दिशा आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


Comments
Post a Comment