कृषी विज्ञान केंद्रात पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याचे थेट प्रक्षेपण

शेतकऱ्यांना सुधारित पीक उत्पादन तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व एकात्मिक कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : येथील कृषी विज्ञान केंद्र, येथे ३० ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमांतर्गत देशातील ९.३४ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण १८ हजार ६८० कोटी रुपयांची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने जमा करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी विविध विकास योजनांसह १२ फलोत्पादन समूहांचा शुभारंभ केला तसेच शेतकऱ्यांना संबोधित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीपक कच्छवे यांच्यासह केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक कच्छवे यांनी दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात घेता येणारी पिके, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, ठिबक व तुषार सिंचन तसेच पाणी बचतीच्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी विदर्भ जलसंवर्धन प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक शिवानी शेंडे, कृषी विभागाचे कृषी अधिकारी प्रदीप वाहाने, कर्मचारी सिंधू नेहारे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्रकुमार देशमुख, मयूर ढोले, सहाय्यक प्राध्यापक स्नेहलता भागवत, राहुल चव्हाण, डॉ. प्रमोद मगर, डॉ. रुपेश झाडोदे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. *‘खेत बचाओ’अभियानांतर्गत मार्गदर्शन* कार्यक्रमा दरम्यान ‘खेत बचाओ’अभियानांतर्गत रासायनिक खतांचा अतिवापर टाळून जमिनीचे आरोग्य जपणे, ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाण्याची बचत करणे, जनावरांसाठी चारा व्यवस्थापन, महिलांचे आरोग्य जपणे तसेच पिकांचे अवशेष न जाळता त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आर. एस. जडोदे यांनी रब्बी पिकांचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान, योग्य पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. तसेच डॉ. पी. एन. मगर यांनी खरीप व रब्बी हंगामातील पिकांवरील कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यासोबतच बदलत्या हवामान परिस्थितीत पाणी व्यवस्थापन, सुधारित पीक उत्पादन तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य संवर्धन आणि एकात्मिक कीड नियंत्रण याविषयी उपयुक्त माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर ढोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राहुल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ तसेच विदर्भ जलसंवर्धन प्रकल्प, केळापूर डब्ल्यूओटीआर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित