जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन
३
ऑक्टोबरपासून सुरुवात होणार
नवमतदारांना
नाव नोंदणीची सुविधा
यवतमाळ, दि. 1
(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित वेळापत्रक जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार
यादीवरील दावे व हरकती सादर करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून
अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत
मतदार नोंदणीसाठी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबीर आयोजित
करण्यात आले होते. मात्र, भारत निवडणूक आयोगाने पुनरीक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्याने
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार नवमतदार व नागरिकांना मतदार
यादीत नाव नोंदविण्याची सुविध उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील
सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतचे निर्देश
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हे विशेष नोंदणी शिबीर सर्व मतदान केंद्रांवर
दि. ३ व ४ ऑक्टोबर आणि दि. १० व ११ ऑक्टोबर आयोजित करण्यात येणार असून या दिवशी सकाळी
१० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध
राहणार आहे.
या विशेष शिबिरांच्या दिवशी सर्व मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी संबंधित मतदान केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनिवार्यपणे
उपस्थित राहणार असून मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेले नमुना क्रमांक ६, ७, ८ इ. सह उपस्थित
राहणार आहेत. नवीन मतदार म्हणून नाव नोंदविणे, मतदार यादीतील नावाबाबत हरकत नोंदविणे
इ. सुविधांसाठी नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे.
विशेष नोंदणी शिबिरांची माहिती जास्तीत
जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
विकास मीना यांनी दिल्या आहेत. यासाठी दवंडी, स्थानिक वृत्तपत्रे, सोशल मिडिया तसेच
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या माध्यमातून नागरिकांना शिबिर व सुविधांची
माहिती देण्यात येणार आहे.
शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी, पर्यवेक्षक तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी संबंधित मतदान केंद्रांना
भेटी देऊन शिबिरांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. शिबिरांच्या
आयोजनामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि नागरिकांना मतदार नोंदणीची सुविधा सुरळीतपणे
मिळावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक विशेष नोंदणी शिबिराच्या दिवशी
मतदान केंद्रांची संख्या, प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या आणि इतर आवश्यक माहितीचा
अहवाल तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडे सादर करण्याच्या सूचनाही
देण्यात आल्या आहेत. यापूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या
पत्रानुसार दिलेल्या सर्व सूचना या विशेष नोंदणी शिबिरांसाठीही लागू राहणार आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी
आणि नवमतदारांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन
जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment