‘नशामुक्त युवा’ मॅरेथॉनला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ, दि. 13 (जिमाका): युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत माय भारत यवतमाळ कार्यालयाच्या वतीने ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत एक दिवसीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मॅरेथॉनमध्ये मुलींच्या गटातून उत्कर्षा राऊत हिने प्रथम, सेजल मेश्राम हिने द्वितीय, तर स्नेहल मडावी हिने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटातून यश धुतकर याने प्रथम, महादेव कोरचे याने द्वितीय, तर कुनाल धोपटे याने तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी न्यू योद्धा फिजिकल अकॅडमीचे संचालक करण रणखांबे यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमादरम्यान भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसही साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्याचे स्मरण करून राष्ट्रीय एकता, अखंडता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
युवकांमध्ये नशामुक्तीविषयी जनजागृती करणे, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणे आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देणे हा मॅरेथॉन आयोजनामागील मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित युवक-युवतींनी नशामुक्त भारत घडविण्याचा संकल्प करत व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. तसेच राष्ट्रीय एकता व अखंडता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी शेळके, मनीष आडे आणि गंगा जाधव यांनी विशेष सहकार्य केले.

Comments
Post a Comment