पुसद तालुक्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’ला गती

> ३८ पाणंद रस्त्यांचे अंदाजपत्रक > ८ कामांचे कार्यारंभ आदेश जारी > राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांच्याकडून सातत्याने आढावा यवतमाळ, दि. 13 (जिमाका): पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी तसेच शेतमजूर आणि जनावरांच्या वाहतुकीसाठी बारमाही पक्के शेतरस्ते उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या अंमलबजावणीला तालुक्यात मोठी गती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील सुमारे १,२११ किलोमीटर लांबीचे ८७६ कच्चे रस्ते पक्के करण्याचे नियोजन असून, याचा थेट लाभ अंदाजे १० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. हे पक्के रस्ते तयार झाल्यास शेतक-यांना शेतीपयोगी कामे करण्यास तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यास मदत होणार आहे. महसूल व वन विभागाच्या दि. १४ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘पुसद विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती’ स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे राज्यमंत्री तथा या समितीचे अध्यक्ष इंद्रनिल नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दि. २४ जानेवारी व दि. २७ एप्रिल २०२६ रोजी समितीच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. तसेच योजनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समितीमधील अधिकाऱ्यांच्या दि. ६ जुलै, १७ जुलै आणि ४ ऑगस्ट २०२६ रोजी नियमित बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांच्या सातत्यपूर्ण आढाव्यामुळे या योजनेला गती आली आहे. सीएसआर निधीतून दोन रस्त्यांची कामे पूर्ण शासन निर्णयातील तरतुदींनुसार, उपविभागीय अधिकारी तथा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सदस्य सचिव यांच्या नावे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पुसद शाखेत स्वतंत्र सी.एस.आर. (CSR) खाते उघडण्यात आले आहे. या खात्यात निधी जमा करण्यासाठी विविध कंपन्यांच्या डिलर्सची बैठक घेऊन आवाहन करण्यात आले असून, विविध कंपन्या, बँका व सामाजिक संस्थांशी पत्रव्यवहारही सुरू आहे. प्राप्त सीएसआर निधीतून मौजा हर्षी येथील आश्रमशाळा ते रेल्वे मार्ग आणि ज्योतीनगर येथील गावठाण ते स्मशानभूमी पर्यंत असे दोन महत्त्वाचे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. ८ कामांचे कार्यारंभ आदेश जारी, उर्वरित प्रस्तावांना गती या योजनेअंतर्गत संमतीपत्र प्राप्त झालेल्या एकूण ३८ रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पुसद यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी १० पाणंद रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार होऊन त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यातील ८ कामांचे कार्यारंभ आदेश जारी करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून त्यांना तांत्रिक मान्यता देत प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना देण्यात आले आहेत. तसेच, प्रस्तावित रस्त्यांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींच्या ठरावांसह तत्काळ सादर करण्याच्या सूचना पुसदचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित