अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ; भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता
यवतमाळ, दि. 18 (जिमाका): यवतमाळ शहरामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी एक सुसज्ज अभ्यासिका सुरु करण्यात येणार आहे. याकरिता यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती भागात, शाळा आणि महाविद्यालयांच्या जवळ असणारी योग्य खाजगी इमारत भाडेतत्वावर आवश्यकता असल्याचे पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
इमारत ही यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि शाळा-महाविद्यालयांच्या जवळ सहज दळणवळण उपलब्ध असलेल्या परिसरात असावी, इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी जागा हवेशीर व प्रशस्त हॉल/खोल्या, स्वतंत्र स्वच्छतागृह मुले व मुलींसाठी स्वतंत्र, पिण्याच्या पाण्याची व अखंडित विजेची योग्य सोय असणे आवश्यक आहे. इमारतीचे बांधकाम अधिकृत व सर्व शासकीय परवानग्यांसह सुरक्षित असावे. शासनाच्या विहित कार्यपद्धतीनुसार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाडे पडताळणी प्रमाणपत्राच्या निकषानुसार भाडे निश्चित केले जाईल.
इच्छुक इमारत मालकांनी आपल्या इमारतीचा मालकी हक्क पुरावा, सातबारा, आठ-अ उतारा किंवा मालमत्ता पत्रक/टॅक्स पावती, इमारतीचा मंजूर नकाशा, उपलब्ध चटई क्षेत्र आणि अपेक्षित मासिक भाडे या तपशिलासह आपला परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांच्या आत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा जिल्हा यवतमाळ या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा नोंदणीकृत पोष्टाने सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment