यवतमाळमध्ये अत्याधुनिक आधार सेवा केंद्र सुरू; नागरिकांना एकाच छताखाली विविध सुविधा!

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते उद्घाटन
यवतमाळ, दि. 18 (जिमाका): नागरिकांना आधारकार्डविषयक विविध सेवा अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी यवतमाळ येथील भारती लेआउट परिसरात नवीन अत्याधुनिक आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजी लि. यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आधारचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक महेश शिंदे, जिल्हा प्रकल्प प्रमुख फिरोज पठाण, केंद्र व्यवस्थापक निशिकांत होरे, प्रोटीनचे ऑपरेशन मॅनेजर अभिजित जयसिंगपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या केंद्रामध्ये नागरिकांना नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग आणि मोबाईल क्रमांकामध्ये दुरुस्ती अथवा बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच फिंगरप्रिंट, डोळ्यांचे स्कॅन आणि छायाचित्र यांसह बायोमेट्रिक अपडेटची सुविधाही येथे मिळणार आहे. लहान मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट, आधार कार्ड डाउनलोड करणे, आधार कार्डची प्रिंट काढणे तसेच ऑनलाइन अपॉइंटमेंटच्या माध्यमातून सेवा घेण्याची सुविधादेखील या केंद्रात उपलब्ध आहे. या केंद्राच्या माध्यमातून आधारविषयक विविध कामांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी सुविधा मिळणार असून, वेळेची बचत होण्यासोबतच आधार सेवांची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वतःचे आधार कार्ड अद्ययावत करून केंद्राच्या कामकाजाची सुरुवात केली. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित