उद्योग सुरू करायचाय? सीएमईजीपी योजनेतून मिळवा लाखोंचे अनुदान !
> स्वतःचा उद्योग उभारण्याची सुवर्णसंधी ;
> उत्पादन, सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक
बनण्याची इच्छा असणाऱ्या युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार
निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) योजनेतून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या
योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प उभारणीसाठी बँकेमार्फत कर्जासोबत
शासनाकडून लाखो रुपयांच्या अनुदानाचाही लाभ दिला जात आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, महिला, दिव्यांग, माजी सैनिक, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती
व अल्पसंख्याक आदी विशेष प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागातील उत्पादन
प्रकल्पांसाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्क्यांपर्यंत, कमाल 17.50 लाख रुपयांपर्यंत
अनुदान मिळू शकते. तर उर्वरित प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागातील उत्पादन
प्रकल्पांसाठी प्रकल्प खर्चाच्या 25 टक्क्यांपर्यंत, कमाल 12.50 लाख रुपयांपर्यंत
अनुदान मिळू शकते.
उत्पादन प्रकल्प
मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत :
या योजनेअंतर्गत उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी कमाल एक कोटी रुपये, तर
सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी कमाल 50 लाख रुपयांपर्यंत प्रकल्प उभारण्याची संधी
उपलब्ध आहे.
नवीन व्यवसायांनाही
प्रोत्साहन :
या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग,
हॉटेल/ढाबा, होम-स्टे, क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी आदी विविध व्यवसायांना
योजनेत प्रोत्साहन देण्यात आले आहे.
फक्त 18 वर्षे पूर्ण
असणे आवश्यक :
स्थानिक अधिवास असलेला व किमान 18 वर्षे पूर्ण झालेला स्वयंरोजगार इच्छुक
अर्जदार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत अर्ज करू शकतो. 10 लाख
रुपयांवरील उत्पादन प्रकल्पांसाठी तसेच 5 लाख रुपयांवरील सेवा व कृषीपूरक
प्रकल्पांसाठी किमान 8 वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
नोकरी शोधू नका, उद्योजक बना
तुमच्याकडे व्यवसायाची कल्पना असेल तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या कल्पनेला उद्योगाचे रूप द्या आणि रोजगार निर्माण
करण्याची संधी मिळवा.
इच्छुकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करावा. अर्जासाठी
maha-cmegp.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग
केंद्र, उद्योग भवन, दारव्हा रोड, यवतमाळ येथे किंवा ०७२३२-२४४०२२ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच महाराष्ट्र
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, तिसरा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ येथे
किंवा ०७२३२-२४४७९१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,
असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी
केले आहे.

Comments
Post a Comment