स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी सेंड बॅक करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांतील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
तसेच, निर्धारित मुदतीत त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आणि ते स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहील, असे समाज कल्याण आयुक्तांनी कळविले आहे.
स्वाधार योजनेकरिता सेंड बॅक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आणि अर्ज विहित मुदतीत समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरला आहे; मात्र त्याची हार्डकॉपी अद्याप कार्यालयात सादर केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज व कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ते स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहणार आहे.
निर्धारित मुदतीत ऑनलाइन अर्जातील त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेंड बॅक करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी १० सप्टेंबर २०२६ पूर्वी आवश्यक त्रुटींची पूर्तता करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.
Comments
Post a Comment