९ सप्टेंबरला डाक जीवन विमा महाअभियान

 


डाक सेवक घरोघरी भेट देणार

यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेला अधिकाधिक बळ देण्यासाठी डाक विभागच्या वतीने  जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी डाक जीवन विमा महाअभियान राबविण्यात येणार आहे.

 या विशेष अभियानांतर्गत डाक विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामीण डाक सेवक घरोघरी भेट देऊन नागरिकांना डाक जीवन विमा  आणि ग्रामीण डाक जीवन विमा  योजनांचे महत्त्व समजावून सांगणार आहेत.

जीवन विम्याचे महत्त्व, आर्थिक सुरक्षितता, विमा योजनेचे फायदे आणि पुरविण्यात येणाऱ्या सुविधा याची माहिती त्या भेटीच्या माध्यमातून जनतेला देण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये आजही जीवन विमा योजनेविषयी जागरुकता नसल्यामुळे जनतेमध्ये विमा साक्षरतेचा प्रसार करून आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. ग्रामीण भागासोबतच आता शहरी जनतेला सुद्धा ग्रामीण डाक जीवन विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे डाक जीवन विम्यापासून वंचित असणाऱ्या जनतेला ग्रामीण डाक विम्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

 आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीचा विमा असणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी जीवन विमा महत्त्वाची पर्याय ठरू शकतो. सन १८८४ पासून डाक जीवन विमा नागरिकांना सेवा देत असून, विश्वासार्हता, तुलनेने कमी प्रीमियममध्ये जास्त बोनस आणि ऑनलाइन प्रीमियम भरण्याची सुविधा डाक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आर्थिक सुरक्षितता, विमा संरक्षण आणि भविष्यातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी विमा संरक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या महाअभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन  डाकघर विभागाचे अधीक्षक मोहन निकम यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित