शेती करतांना अपघाती मृत्यू, अपंगत्व झाल्यास दोन लाखांपर्यंत आर्थिक मदत
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान
योजना ;
शेतकरी, वारसांनी लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : शेती व्यवसाय करताना शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याचा
अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य उपलब्ध
करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह
अनुदान योजना राबविण्यात येत आहे. पात्र शेतकरी व वारसदारांनी विहित मुदतीत अर्ज करून
या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी
केले आहे.
राज्य व जिल्ह्यातील सर्व
वहितीधारक खातेदार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक
खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्यदेखील योजनेचा लाभ घेऊ शकतो. कुटुंबातील पात्र
सदस्यामध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी किंवा पती, मुलगा अथवा अविवाहित मुलगी यांचा
समावेश होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पात्र व्यक्तीचे वय १० ते ७५ वर्षे असणे
आवश्यक आहे.
दोन लाखांपर्यंत
मिळते अनुदान :
योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू
झाल्यास २ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. तसेच अपघातामुळे दोन डोळे, दोन हात किंवा
दोन पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, तर एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास
१ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.
अपघाताचे
प्रकार कोणते ?
या योजनेत रस्ता किंवा रेल्वे
अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, कीटकनाशके हाताळताना किंवा अन्य कारणाने विषबाधा, वीज
पडणे, खून, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, वन्यप्राण्यांचा हल्ला,
उंचावरून पडणे, दंगल, बाळंतपणातील मृत्यू तसेच इतर पात्र अपघातांचा समावेश करण्यात
आला आहे.
‘ही’
कागदपत्रे आवश्यक :
योजनेचा लाभ घेण्यासाठी
अर्जासोबत ७/१२ उतारा, मृत्यू दाखला, नमुना क्रमांक ६-क, वारसदाराचे ओळखपत्र, अपघातग्रस्त
व्यक्तीच्या वयाचा दाखला किंवा पुरावा, घटनास्थळाचा पंचनामा, वैध वाहन परवाना, प्रथम
माहिती अहवाल (एफआयआर) किंवा पोलिस पाटील अहवाल तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक
कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
३० दिवसांच्या
ऑनलाइन अर्ज आवश्यक :
अपघाताची घटना निदर्शनास
आल्यानंतर संबंधित शेतकरी किंवा वारसदारांनी ३० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह
ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवरील अर्जाचे संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in कृषी विभागाच्या सुविधेचा
वापर करता येणार आहे.
संपर्क
योजनेची अधिक माहिती व अर्ज
प्रक्रियेबाबत संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments
Post a Comment