अमोलकचंद महाविद्यालयात भटके विमुक्त दिवस साजरा
> गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कार
यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : स्वातंत्र्यातील
व राष्ट्र उभारणीतील भटके विमुक्त समाजाचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ
३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’म्हणून साजरा करण्यास शासनाने
मान्यता दिली असून त्यानिमित्त यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयातील वसंतराव नाईक
सभागृह येथे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या वतीने भटक्या विमुक्त समाजाची संस्कृती,
जीवनमूल्ये व परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम तसेच
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी अनिरुध्द
बक्षी होते, तहसीलदार,डॉ. योगेश देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा
समाज कल्याण अधिकारी ज्योत्सना तिजारे, रामेश्वर भिसे, पांढुरंग गदई, गजानन जाधव, डॉ.
महेश चव्हाण, नवलकिशोर राठोड, प्रा. व्ही. सी. जाधव, प्रा. डी. एस. चव्हाण, प्रा. आर.
के. मुहेलवार, लक्ष्मीप्रसाद बाघमोडे, बोरगरवार, संदिप शिंदे, जयदीप पवार आदी उपस्थित
होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे
उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी जिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी
भटके विमुक्त समाज, परंपरा आणि स्थिती या विषयावर मार्गदर्शन करताना समाजाचा शौर्यपूर्ण
इतिहास, कलात्मक परंपरा आणि सध्याच्या समस्यांची मांडणी केली.
भटके विमुक्त दिनानिमित्त जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये
भटके विमुक्त समाजाचा इतिहास, परंपरा व सद्यस्थिती या विषयांवर निबंध व वक्तृत्व स्पर्धांसह
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक
वेशभूषा परिधान करून भटक्या विमुक्त समाजाची संस्कृती, जीवनमूल्ये व परंपरा दर्शविणारी
विविध सांस्कृतिक नृत्ये सादर केली. सेवा ग्रामीण विजाभज प्राथमिक आश्रमशाळेचे विद्यार्थी
क्रीश किशोर राठोड व कोमल नागोराव चव्हाण तसेच स्व. सजनीबाई आडे विजाभज उच्च माध्यमिक
आश्रमशाळा, महाळूंगी येथील विद्यार्थिनी मंजुषा साहेबराव प्रधाने यांनी विमुक्त समाजाचा
इतिहास, समाजाची परंपरा व सद्यस्थिती या विषयावर उत्कृष्ट भाषणे केली.
आश्रमशाळेतील रागिणी जाधव शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात
दुसरी
तसेच स्व. बाबासाहेब नाईक विजाभज आश्रमशाळा, सातघरी, ता. महागाव
येथील विद्यार्थीनी रागिणी रोहिदास जाधव हिने शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये राज्यातून
द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा प्रशस्तिपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळांमधील अनिवा शेख
अनीस, वरद राजेश चितावार, राम पंकज देवसरकर व वेदिका रविंद्र चव्हाण यांची एम.बी.बी.एस.
अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल, तर यश प्रदीप चोपडे याची आयआयटी धनबाद येथे निवड
झाल्याबद्दल त्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यासह विविध क्षेत्रांत प्राविण्य
मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र, मानचिन्ह तसेच क्रांतिसूर्य महात्मा
ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित समग्र वाङ्मय
ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी प्रास्ताविकात शासनाच्या
भटके-विमुक्त समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन ज्योत्सना संदीप पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजेंद्र राऊत यांनी
केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहरुन मुंजेवार, निरीक्षक गजेंद्र राऊत, निरीक्षक
अभिजित घोडे, निरीक्षक योगेश बडवाईक, अविनाश वाघमारे, स्मिता झलके, तुषार कोलकर, सतीश
वानखेडे, सचिन ढगे, सुनंदा राठोड, प्रीती कांबळे तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व
भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित, यवतमाळ येथील कर्मचारी व इतर कर्मचारीवृंद यांनी
परिश्रम घेतले.



Comments
Post a Comment