दुष्काळग्रस्त भागात पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी ; महसूल, कृषी आणि ग्रामविकास यंत्रणा पोहोचली बांधावर

 



             यवतमाळ, दि.28 (जिमाका) : खरीप हंगामामध्ये ट्रिगर-१ लागू झालेल्या जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मिना यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.  या आदेशानुसार तालुक्यांमध्ये क्षेत्रीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्तपणे पंचनामे करण्यात येत आहेत.

            यापूर्वी २८ जून २०१८ रोजीच्या निर्देशानुसार प्रपत्र ‘क’मध्ये पंचनाम्याचा अहवाल संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने कृषी विभागाचे सचिव तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी सुधारित प्रपत्राचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ट्रिगर-१ लागू झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये संबंधित क्षेत्रीय यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करावेत. यामध्ये शेतकऱ्याचा अ‍ॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक घ्यावा. ज्या शेतकऱ्याचा अ‍ॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक उपलब्ध नसेल, अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंचनाम्याच्या याद्या ग्रामपंचायतीत प्रसिद्ध होणार

            पंचनाम्यादरम्यान संकलित करण्यात आलेल्या याद्या संबंधित ग्रामपंचायत तसेच तलाठी साजा यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या याद्यांमध्ये काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास बाधित शेतकऱ्यांना हरकती नोंदविता येणार आहेत. प्राप्त हरकतींची आवश्यक ती पडताळणी करून त्यानंतर अंतिम याद्या तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

पंचनाम्याची संपूर्ण कार्यवाही निर्धारित कालावधीत पूर्ण करून संकलित अहवाल २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांच्या कार्यालयात सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत.

महसूल, कृषी आणि ग्रामविकास यंत्रणा बांधावर

            दुष्काळग्रस्त भागातील शेतपिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी होताच जिल्ह्यातील महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली. त्यांनी यवतमाळ तालुक्यातील अर्जूना येथे कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे केले. या संयुक्त कार्यवाहीमुळे पंचनामे गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित