‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे यंदाचा गणेशोत्सव येणार जागतिक पटलावर;
गणेशोत्सवाच्या परंपरा, कला व संस्कृतीचे होणार डिजिटल जतन
निवासी
उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी अनिरुद्ध बक्षी
यवतमाळ,
दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवातील विविध परंपरा, कला, विधी आणि
आठवणींचे डिजिटल स्वरूपात जतन करून हा समृद्ध वारसा जगासमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र
शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘बाप्पा डॉट ओआरजी’
(https://bappa.org) हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी
तथा नोडल अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी दिली.
महाराष्ट्राच्या
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाशी
जोडलेल्या कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ
उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. पुरातत्त्व
संचालनालयाने विकसित केलेल्या या अधिकृत डिजिटल मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह
देश-विदेशातील नागरिकांना घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील विविध पैलूंची नोंद
करता येणार आहे. गणेशमूर्ती व सजावटीची छायाचित्रे, व्हिडिओ, कौटुंबिक विधी, जुन्या
आठवणी, पारंपरिक खाद्यसंस्कृती, आरती आणि इतर सांस्कृतिक परंपरा या डिजिटल संग्रहात
समाविष्ट करता येतील.
यवतमाळचा सांस्कृतिक वारसाही होणार
डिजिटल
जिल्ह्यात
घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची
वैशिष्ट्ये, पारंपरिक आरत्या, स्थानिक सजावट, खाद्यपरंपरा, मूर्तिकला तसेच लोककलांच्या
विविध स्वरूपांची नोंद https://bappa.org वर करून यवतमाळ जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख
देश-विदेशापर्यंत पोहोचविण्याची संधी या अभियानातून उपलब्ध झाली आहे.
गणेशोत्सवाला
समृद्ध करण्यात मूर्तिकार, लोककलावंत आणि पारंपरिक कलांशी निगडित कारागिरांचा मोठा
वाटा आहे. त्यांच्या कला व परंपरांचे कायमस्वरूपी डिजिटल दस्तऐवजीकरण झाल्याने स्थानिक
कलावंत आणि कलापरंपरांना व्यापक ओळख मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर सांस्कृतिक आणि
आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
सहभाग नोंदवा; प्रमाणपत्र मिळवा
आपल्या घरातील
किंवा परिसरातील गणेशोत्सवाची माहिती या अभियानात नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे
‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांना केवळ आपल्या आठवणी जतन करण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक वारशाच्या डिजिटल दस्तऐवजीकरणात प्रत्यक्ष योगदान देता येणार आहे.
‘तुमची कथा सांगा’ आणि आपली परंपरा जगापर्यंत पोहोचवा
नागरिकांनी
https://bappa.org या संकेतस्थळावर जाऊन खाली स्क्रोल केल्यानंतर ‘माहिती’
(Information) चिन्ह निवडावे. त्यानंतर ‘तुमची कथा सांगा’ या पर्यायावर
क्लिक केल्यावर कथा (Story), पाककृती (Recipe), परंपरा (Tradition) आणि थेट आरती
(Live Aarti) हे चार पर्याय उपलब्ध होतील. नागरिकांना एका किंवा सर्व पर्यायांमध्ये
माहिती भरता येईल. मोबाईलमधील लोकेशन सुविधा बंद असल्यास पिनकोड नोंदविणे आवश्यक आहे.
या डिजिटल
मंचावर गणपतीच्या आरत्या आणि भक्तिगीते उपलब्ध असून नागरिकांना गणेशोत्सवातील आपल्या
आठवणी व अनुभव शेअर करता येतील. घरगुती किंवा सार्वजनिक मंडळातील आरतीचा व्हिडिओ तसेच
गणेशमूर्तींची छायाचित्रेही अपलोड करून या जागतिक डिजिटल संग्रहाचा भाग होता येईल.
जिल्ह्यातील
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती, शहरी व ग्रामीण भागातील
नागरिक, विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि शासकीय यंत्रणांनी या डिजिटल लोकचळवळीत
सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा, परंपरा,
पाककृती, आरत्या, छायाचित्रे आणि सांस्कृतिक वारसा https://bappa.org या मंचावर जास्तीत जास्त प्रमाणात
नोंदवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी
केले आहे.

Comments
Post a Comment